You are currently viewing दुसरे एल्गार एक गझलोत्सव

दुसरे एल्गार एक गझलोत्सव

*दुसरे एल्गार एक गझलोत्सव*

*दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन*

दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी साधना सेवाभावी संस्था, अंबाजोगाई, आयोजित दुसरे अखिल भारतीय एल्गार गझल संमेलन, मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबाजोगाई इथे आद्यकवी मुकुंदराज सभागृहात संपन्न झाले.
संमेलन यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी संमेलनाचे केंद्रबिंदू व आधार स्तंभ म्हणजे स्वागताध्यक्ष माननीय दगडू मथुरा बाबुराव लोमटे दादा व त्यांच्या सहकारी असलेले अवलिये म्हणजे दास पाटील सर, वैभव वसंतराव कुलकर्णी सर, निशा चौसाळकर मॅडम, अमिता पेठे पैठणकर मॅडम, शिव डोईजोडे सर व संपूर्ण आयोजन समिती होती.

संमेलनाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ गझलकार माननीय डॉ. दिलीप पांढरपट्टे सरांनी भुषविले आणि संमेलन उद्घाटक गझलकार माननीय संदीप गुप्ते सर होते.

ह्या गझल एल्गार संमेलनात एकूण १८ मुशायरांचे आयोजन केले होते. दिवंगत ज्येष्ठ गझलकारांच्या स्मृती प्रीत्यर्थ मुशायरे घेणे हा स्तुत्य उपक्रम होता.

संमेलन मंचास व पहिल्या स्मृती मुशायऱ्यास दिवंगत श्रेष्ठ गझलकार सतिश दराडे सरांचे नाव दिले होते. उरलेल्या सत्रा मुशायरांना खालील प्रमाणे नावानी अभिवादन केले होते.
२) स्व.राम मुकद्दम स्मृती मुशायरा ३) स्व. कमलाकर आंबा देसले स्मृती मुशायरा ४) स्व. मनोहर रणपिसे स्मृती मुशायरा ५) स्व.अरुणोदय भाटकर स्मृती मुशायरा ६) स्व. इराणी जमादार स्मृती मुशायरा ७) स्व. अनिल कांबळे स्मृती मुशायरा ८) स्व. मधुसूदन नानिवडेकर स्मृती मुशायरा ९) स्व. बशर नवाज स्मृती मुशायरा १०) स्व.प्रकाश मोरे स्मृती मुशायरा ११) व्यंकटराव देशमुख स्मृती मुशायरा १२) विनिता कुलकर्णी पाटील स्मृती मुशायरा १३) नाना बेरगुडे स्मृती मुशायरा १४) स्व.सुप्रिया जाधव स्मृती मुशायरा १५) स्व.उ. या. गिरी स्मृती मुशायरा १६) स्व.लक्ष्मण जेवणे स्मृती मुशायरा १७) स्व. गिरीश खारकर स्मृती मुशायरा आणि १८) स्व. बदिउज्जमा स्मृती मुशायरा अशा प्रमाणे अतिशय शिस्तबद्ध आयोजन केले होते. प्रत्येक मुशायराला अध्यक्ष, सूत्रसंचालक /संचालिका, सहभागी गझलकार/ गझलकारा, सत्र समन्वयक, स्वागत व आभार प्रदर्शन असे सुंदर नियोजन केले होते. नियोजन कमिटीचे कौतुक करावे तितके थोडेच.

संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ – श्रेष्ठ गझलकार माननीय डॉ. दिलीप पांढरपट्टे सरांनी स्वतःचा अनुभव,आ.गझल सम्राट सुरेश भट साहेबांशी पत्र व्यवहार व त्यांना भटसाहेबांनी “बाराखडी” पुस्तिका देऊन गझल लेखनास प्रवृत्त कसे केले हे सांगितले. त्यांचे व दगडू दादांचे मनोगत एका पुस्तिकेच्या रुपात प्रत्येक गझलकारास देण्यात आले. तसेच आपल्या मनोगतात त्यांनी गझलकारांना मोलाचा संदेश दिला. प्रत्येक गझलकाराने आपला वाचनाचा व्यासंग वाढवावा व दुसऱ्यांच्या गझला ऐकाव्यात. ह्या सोबतच मराठी गझलकारांनी जाणिवपूर्वक उर्दू भाषा शिकून उर्दू गझलाही अभ्यासून घ्यायला सांगितले.

संमेलन उद्घाटक माननीय संदीप गुप्ते सरांनी गझलेच्या प्रचारात संगीतकार व गायक यांचा खूप मोठा वाटा आहे हे अधोरेखित केले. प्रख्यात गझलकारांचे शेर नवोदितांनी जास्तीत जास्त मुखोद्गत करून संग्रही ठेवावे असे ही सांगितले. त्यांचा स्वत:चा उर्दू भाषेतला दीवान-ए-संदीप प्रकाशित झालेला आहे.

दुसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनामध्ये जेष्ठ गझलकारा आदरणीय संगीता जोशी ह्यांच्या “दीवान-ए-संगीता” ह्या दीवानचे प्रकाशन गझलकार संदीप गुप्ते व बाकी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि मराठी गझल साहित्यात सहाव्या दीवाणची भर घातली.

गझल रचनांना संगीताची साथ देणारे व गझल सम्राट सुरेश भट साहेबांनी ज्यांना “गझल गंधर्व” ही उपाधी दिली, असे जेष्ठ संगीतकार व गायक आ. गझल गंधर्व सुधाकर कदम ह्यांस साधना सेवाभावी संस्था, अंबाजोगाई यांनी “गझल साधना पुरस्कार २०२५” चे पहिले मानकरी ठरवून रोख अकरा हजार देऊन पुरस्कृत केले.

एकूण झालेल्या 18 मुशायऱ्यातून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील आलेल्या सर्व स्तरातील गझलकार/गझलकारांनी वेगवेगळ्या खयालांचे उत्कृष्ट शेर व गझला सादर करून श्रोत्यांना खिळवून ठेवले. एकसे बढकर एक असे मुशायरे झाले. त्याच प्रमाणे प्रत्येक मुशायराचे सुत्र संचालन ही अनेक मान्यवरांचे उत्कृष्ट दर्जाचे शेर ऐकवून झाले. माझ्या बाराव्या मुशायराचे सुत्र संचालन गझलकार शैलेश देशपांडे सरांंनी आम्हाला वेळोवेळी ग्रुपमध्ये सर्व सुचेना देऊन अतिशय सुंदर रितीने मुशायरा फलीत केला.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय दगडू लोमटे सरांनी आपल्या मनोगतात एक उपयुक्त घोषणा केली. ते म्हणाले की गझल क्षेत्रातील,आर्थिक स्थिती बेताची असलेल्या गझलकारांसाठी ऐन अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी एक आर्थिक कोश निर्माण करण्यात येईल. ह्या घोषणेने तळागळातील गझलकारांना गझल लेखनाचे नक्कीच बळ येईल ह्यात शंकाच नाही.

आमचे दगडू दादा एक अवलियाच म्हणायला हवेत. दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन ठरल्या पासून ह्या माणसाने जरा ही उसंत घेतली नसेल. दोन चार महिने त्यांनी झोप ही बरोबर घेतली नसेल.आम्ही फक्त त्यांना संमेलनाच्या दोन दिवसच पाहिले. ते पायाला भिंगरी लावल्यासारखे वावरत होते. गझलकारांची कुठलीच गैरसोय होऊ नये म्हणून सारखी धावपळ करत होते.

आयत्या वेळी प्रेक्षक संख्या ९०० वरती झाल्यांने आद्य कवी मुकुंदराज सभागृहात संमेलन व्यवस्था करावी लागली. त्यामुळे जेवणाची व्यवस्था पूर्वीच्याच ठिकाणी असल्याने गझलकारांना ने-आण करण्यासाठी स्कुल बस व प्रायव्हेट गाड्यांची सोय करून सगळे व्यवस्थित पार पाडले. कुणाची कुठलीच गैरसोय झाली नाही. सर्व महिला गझलकारांची छान लाॅजमधे राहण्याची व्यवस्था केली होती व पुरूष गझलकारांना ही एकत्र ठेऊन सर्व सुख सोईंची व्यवस्था छान केली होती.

अठरा मुशायरे आणि जवळ जवळ दोनशे गझलकारांच्या गझला!! कुणी अंदाजही करू शकणार नाही अशा ह्या गझलोत्सवात सगळे चिंब भिजून गेले. वेगवेगळ्या खयालांचे शेर, सामाजिक, प्रादेशिक, प्रेम, विरह, वास्तव इत्यादी ऐकून मन तृप्त झाले.

ह्या संमेलनात बऱ्याच नवीन ओळखी झाल्या. फक्त नावाने ओळखत होतो ते प्रत्यक्ष भेटल्यावर आनंद तो काय वर्णावा!
सगळ्यांबरोबर फोटो घेता आले नाही ह्याची खंत वाटली. सभागृहाबाहेर गझल संग्रहाचे प्रदर्शन ही मांडले होते. गझल वाचक प्रेमी ते खरेदी करण्यातही मग्न झाले होते.

ह्या दुसऱ्या अखिल भारतीय एल्गार गझल संमेलनामध्ये दोन दिवस गझलोत्सवात तुडुंब न्हाऊन निघाले. सगळेच मुशायरे इतके मंत्रमुग्ध करणारे होते की सभागृह सोडून जवेसेच वाटत नव्हते. त्यामुळे अंबाजोगाई येथील प्रेक्षणीय स्थळे पहायची राहूनच गेली. त्यामुळे पुन्हा अंबाजोगाईला यावे लागेल.

आ. दगडू दादा व सर्व आयोजक टीमचे मी मनापासून धन्यवाद मानते.
धन्यवाद🙏🌹

शोभा वागळे
मुंबई (पुणे)
8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा