You are currently viewing सीईटी सेल चा निर्णयानुसार प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत

सीईटी सेल चा निर्णयानुसार प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत

विविध प्रवर्गातून व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी मुदत दिल्‍याने विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. बुधवारी (ता.२०) ही मुदत संपत असताना सीईटी सेलने महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी निश्‍चित केलेल्‍या अंतिम दिनांकापूर्वीपर्यंत मुदत असेल. तोपर्यंत तात्‍पुरता प्रवेश ग्राह्य धरला जाणार असून, प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द ठरविले जाणार असल्‍याचे निर्णयात नमूद केले आहे.

निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा

यापूर्वी सीईटी सेलने जारी केलेल्‍या धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्‍या-त्‍या अभ्यासक्रमांच्‍या प्रथम फेरी संपण्यापूर्वी प्रमाणपत्रे सादर करण्याची मुदत दिली होती

मात्र मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळू शकले नव्‍हते. अशात ही मुदत वाढवून बुधवार (ता.२०)पर्यंत प्रमाणपत्रे अपलोड करण्याच्‍या सूचना गेल्‍या आठवड्यात जारी केल्‍या होत्‍या. तेव्‍हापासून समाजकल्‍याण विभागांमध्ये जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. तरीदेखील सर्व विद्यार्थ्यांना सायंकाळी उशिरापर्यंत प्रमाणपत्र उपलब्‍ध होऊ शकले नव्‍हते. ही गोष्ट लक्षात घेता, बुधवारी (ता.२०) सीईटी सेलने महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे.

अन्‍यथा अशा उमेदवारांचा प्रवेश रद्द

या सूचनेत म्‍हटले आहे, की राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रवेश घेणाऱ्या पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी अर्ज करताना ईडब्‍ल्‍यूएस, एनसीएल आणि जातवैधता (सीव्‍हीसी) प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी पावती सादर केलेल्‍या सर्व उमेदवारांना केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेत त्‍या-त्‍या संबंधित प्रवर्गातून जागावाटप करण्यात येईल. अशा उमेदवारांना केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून ज्‍या प्रवर्गातून जागावाटप करण्यात येईल त्‍या-त्‍या प्रवर्गातून संस्‍थेत प्रवेश दिला जाईल. हा प्रवेश तात्पुरता प्रवेश म्‍हणून ग्राह्य धरण्यात येईल. संबंधित अभ्यासक्रमांची केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया संपल्‍याच्‍या अंतिम दिनांकाच्‍या आत संबंधित उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील; अन्‍यथा अशा उमेदवारांचा प्रवेश रद्द ठरविण्यात येतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा