You are currently viewing सांग चुकली रे कुणाला…

सांग चुकली रे कुणाला…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सांग चुकली रे कुणाला….*

 

संकटे ना सरली अजुनी इतक्यात तू थकलास का

रे निशा संपून जाते विसरलास तू सांग का…?

ऊन जाते सावली ती नियम सृष्टीचा असे

कंटकातही फुल उमले बघना हसते कसे?…

 

चिखल किती तो पायतळी कमळ ते निर्लेप रे

पान पिवळे तरूतळी ते कोंभ ठेवूनी जाई रे

एक जातो एक येतो तरूण सारे भासती

सांग चुकली रे कुणाला मांडलेली ती गती…

 

हसत जावे सांगती त्या पर्णपताका जरी

जातांनाही खुलती रंग होती बघ त्या भरजरी

क्षितिज काळोखात बुडते पलिकडे आदित्य रे

जात नाही येत नाही सृष्टीचे हे रूप खरे…

 

तरूण असते चांदणे रे तारका त्या तरूण किती

लोपल्या जरी पहाटे दिवसाही त्या चमकती

उदधी गिळतो नारायणा फिरून ये जगतातूनी

प्राची उधळे अश्व त्याचे शलाका त्या घेऊनी…

 

सारे आहे शाश्वत रे जातो येतो काळ तो

मरत नाही कोणी येथे फक्त वस्त्रे बदलतो

भूल पडते पण जीवाला मोहमाया गांजते

ही कहाणी जीवनाची दु:ख कोणी टांगते…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा