*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*प्रेम लाभे प्रेमळाला*
*एक अर्धसत्य*
साने गुरुजी म्हणतात,
। खरा तो एकची धर्म ।
।जगाला प्रेम अर्पावे॥
संत तुकाराम म्हणतात,
।जे का रंजले गांजले।
।त्यासी म्हणे जो आपुले।
।तोचि साधु ओळखावा।
।देव तेथेचि जाणावा॥
एक कवी म्हणतो,
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
प्रेमाच्या गावा जावे
प्रेमाने जग जिंकावे
प्रेमाचे गाणे गावे….
अशा प्रकारची सारी सुवचने, सुविचार आदर्शवत आहेत आणि आपण सारे जण वेळोवेळी ती ऐकत आलो आहोत, वाचत आलो आहोत, अंगी बाळगण्याचा प्रयत्नही करत आलो आहोत.
प्रेम ही एक भावना आहे. तो एक सद्गुण आहे. प्रेम करणं ही वृत्ती आहे आणि अशा वृत्तीच्या व्यक्तीला आपण प्रेमळ व्यक्ती म्हणतो. प्रेमळ व्यक्तीच्या चेहऱ्यावर सदैव प्रेमभाव असतात. स्निग्ध चर्यांच्या या व्यक्तींच्या नजरेत स्नेहभाव दाटलेला असतो. त्यांच्या स्पर्शातही मायेची आधारक्षम ऊब असते. अशा माणसांची वाचाही मृदु, प्रेमभाव व्यक्त करणारी असते. त्यांच्या मुखातून निघणारे उद्गारही फुलासारखे कोमल, सुगंधित असतात. कोणाचा अपमान होईल अथवा कुणाच्या डोळ्यात अश्रू येतील असे भोचक, जाचक बोलणं त्यांना जमतही नाही. फार तर ते मौन बाळगतील पण कुणाला दुखावणार नाहीत. तेव्हा अशा व्यक्ती असतात प्रेमळ ज्यांचा सहवास सुखद असतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ईश्वरी अंश जाणवतो मात्र “प्रेम लाभे प्रेमळाला” या उक्तीचा विचार करताना माझ्या मनात येते की, एक वाक्य म्हणून, विचार म्हणून किंवा प्रेमाचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही ओळ नक्कीच छान आहे, आदर्शवत् आहे पण हे खरं आहे का किंवा हे पूर्ण सत्य आहे का?
मला वाटते,” नाही.”
अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही.
एखाद्या चांगल्या मनाच्या प्रेमळ व्यक्तीला नेहमीच समाजाकडून किंवा कुटुबियांकडून, मित्र परिवाराकडून तितकेच प्रेम, आदर अथवा चांगुलपणाचा अनुभव येईलच असे म्हणता येणार नाही. जशी प्रेम करणं ही वृत्ती आहे तशीच दुसऱ्याला गृहीत धरणे ही सुद्धा एक वृत्तीच आहे. एखाद्याच्या चांगुलपणाचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेणे आणि काम झाल्यावर “गरज सरो नि वैद्य मरो” या भावनेने त्या चांगल्या व्यक्तीला पाठ दाखवणारेही भोवतालच्या समाजात अस्तित्वात असतात. कामापुरतं गोड बोलणं, समोरच्या व्यक्तीची सहानुभूती मिळवणं, त्याच्या प्रेमाचा फायदा घेणं आणि यदाकदाचित त्या व्यक्तीवर काही प्रसंग ओढवला तर ओळखही न दाखवणारे महाभाग काही कमी नाहीत. थोडक्यात “प्रेम लाभे प्रेमळाला” ही उक्ती मनुष्यवृत्तीचा सामान्यपणे विचार केला तर अर्थहीन आहे.
आईबाप आपल्या मुलांवर प्रेम आणि फक्त प्रेमच करतात, बहीणभावातही प्रेमाचं नातं असतं, मित्र-मैत्रिणीत प्रेमाचे धागे असतात, प्रियकर-प्रेयसी प्रेमबंधनात अडकतात, शेजाऱ्यांवरही प्रेम असते पण तरीही कधीतरी परिस्थिती बदलते. याच प्रेमाच्या नात्यांनाही गंज लागतो. समज -गैरसमज होतात. अस्सल भावनांचाही कस टिकत नाही आणि पर्यायाने प्रेमाची नातीही तुटतात, तुकडे होतात, चिंध्या होतात आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या पदरी फक्त नैराश्य आणि दुःखच येतं. “प्रेम लाभे प्रेमळाला” या सौजन्यपूर्ण उक्तीला तिलांजली मिळते. “प्रेम लाभे प्रेमळाला” हा निव्वळ भ्रम ठरतो, एक नकारात्मकरित्या थक्क करणारा अनुभव ठरतो पण याचा अर्थ असाही नव्हे की प्रेमाने वागू नये. चांगुलपणा अंगी बाळगूच नये, फसवणुकीच्या किंवा विश्वासघाताच्या भीतीने दूरस्थ रहावे अथवा तुटक राहावे, जेवढ्यास तेवढेच असावे.
एक सांगावसं वाटतं…जे मनुष्यजीवनाला लागू होतं ते प्राणीमात्रांच्या बाबतीत मात्र विरुध्द ठरू शकतं. माणसांनी केलेलं प्रेम जनावरं कधीच विसरत नाही. त्यांचा प्रतिसाद सदैव कृतज्ञतेचाच असतो.
मात्र हे विसरू नये की मूठभर चांगल्या माणसांमुळेच समाज टिकतो, समाजाची संस्कृती अबाधित राहते, धर्म कलंकित होत नाही, माणुसकीचा लोप होत नाही. खरं प्रेम करणारी व्यक्ती “प्रेम लाभे प्रेमळाला” या अपेक्षेने काही सत्कृत्य करतच नाही तर त्यांच्या वागण्याचा कलच सदोदित चांगुलपणाकडे असतो. त्याग हाच त्यांच्या प्रेमाचा पाया असतो म्हणून ते जगाला फक्त प्रेमच अर्पण करतात.
*राधिका भांडारकर*