You are currently viewing चांदणे शिंपित आली..

चांदणे शिंपित आली..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चांदणे शिंपित आली…*

 

चांदणे शिंपित आली जीवनाची ही घडी

उंच गेली आभाळी ती डौलाने फडके गुढी…

 

काय काय नाही केले, काय काय केले हो

कंटकांच्या होत्या राशी फुलझेले कधी हो

चालणे माहित होते..चाल होती फाकडी…

चांदणे शिंपित आली….

 

चांदणे केले उन्हाचे त्यात केला गारवा

मोती झाले घामाचे नि जग म्हणाले वाह! वा!

कष्टाला येतेच फळ हो..वेळ जरी ती वाकडी

चांदणे शिंपित आली…

 

चाल ठेवावीच साधी सत्य ठेवावे मुखी

चांदणे होते उन्हाचे दु:खे होती पारखी

शुद्ध गंगा ती मनीची भाषा होती रोकडी

चांदणे शिंपित आली…

 

मार्गावरूनी चाललो ज्या अडथळ्यांची शर्यत

गेलो ओलांडून तरीही टेकड्या नि पर्वत

साथ दैवाची मिळाली मऊमखमली चौघडी

चांदणे शिंपित आली…..

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा