You are currently viewing पोकळ बाता…

पोकळ बाता…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पोकळ बाता….*

 

पोकळ बाता किती मारती उपदेशाचे डोस किती

खोटेपण हे नसानसातून वाटत नाही कशी भिती

अंतर्यामी डोकावून हो आपण आपल्या पहा जरा

माहित आहे कसा आहे तो खरा आपुला हो चेहरा..

 

स्वत:स फसवा इतरांनाही नका करू हो पाप असे

पश्चातापाची ती खाई तोंड वासून उभी असे

उपदेशापरी वर्तावे हो कशास वाफा तोंडाच्या

पितळ उघडे तोच पाडतो न्याय घरी हो देवाच्या…

 

किती ही फुगली जरी बेडकी मर्यादा हो तिला असे

फुटून जातो फुगा नि मग हो जगात होते तिचे हसे

वागण्यातून आदर्शांना आपण आपल्या स्थापावे

उगा वल्गना करू नये हो संयमित ते वागावे…

 

कृती करावी आधी आपण “बोले तैसा जो चाले”

“राम मुहमे छुरी बगलमे”कशास शब्दांचे भाले?..

कुपमंडूक जग तेवढे सागरात तरतील कसे?

जग पाहती विहिरीतून हो उदधी त्यांना तोच दिसे

 

दुस्वासाने भले कुणाचे कधीच जगती ना झाले

औकात आपली ओळखून हो सुज्ञ जगती तो चाले

पंख आपुले बळ आपुले आपुले आपण जोखावे

रूप आपले खरे जाणता फुका कशाला देखावे…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा