*वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या चालकांवर कारवाई*
*सावंतवाडी आंबोली मार्गावर सातोळी तिठा येथे ड्रंक अँड ड्राईव्ह गुन्हा दाखल*
सावंतवाडी
सिंधुदुर्गात अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सिंधुदुर्गात ड्रंक अँड ड्राईव्ह, काळ्या काचा, इतर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये, वाहन चालकांच्या बेपर्वाईमुळे अपघात होऊ नयेत, यासाठी सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस कर्तव्यात कसूर न करता वाहनचालकांची तपासणी करीत आहेत.
दरम्यान, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सापळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत धुमाळे, पोलीस नाईक अमोल धुरी यांनी मंगळवारी सावंतवाडी आंबोली मार्गावर सातोळी तिठा येथे ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या कराड तालुक्यातील गणेश भिसे या वाहन चालकाची तपासणी केली असता, दोषी आढळल्याने त्याच्यावर मोटर वाहन कायदा कलम १८५ (अ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कलमान्वये सावंतवाडी दिवाणी न्यायालयात गणेश भिसे या वाहनचालकावर दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई झाली.