*बांदा एसटी स्टँड नजीक साईड रोड हवा*
*बांदा भाजपा सह ग्रामस्थांनी केली मागणी*
बांदा:- बांदा एसटी स्टँड नजीक असलेल्या बॉक्ससेल करिता साईड रोड करून मिळावा या मागणीसाठी आज बांदा भाजपा पदाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीच्या निवेदनासह राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. बांदा निमजगा शाळा ते पाटो पुलमार्गे मच्छी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गाचा बॉक्ससेल असून त्याच्या केवळ एकाच बाजूला साईडरोड असल्याने बांदा शहरातील निमजगा,शेटकरवाडी,आळवाडी मौर्यवाडा,उभाबाजार या वाड्यांना तसेच शेजारील वाफोली गावातील ग्रामस्थांना देखील महामार्गावर जायचे असल्यास दोन किलोमीटरचे अंतर कापत महामार्गावर जावे लागते. ग्रामस्थांची होणारी ही अडचण लक्षात घेत बांदा भाजपा पदाधिकारी यांनी साईडरोडच्या मागणीकरिता ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे अभियान राबवत आज राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सावंतवाडी कार्यालयाला भेट दिली व निवेदन सादर केले यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या होणाऱ्या गैरसोईबद्दल जाणीव करून दिली असता, अधिकाऱ्यांनी सदर बाबतची मागणी आपण वरिष्ठ कार्यालयाला लगेच कळवतो असे सांगितले. तसेच पुढील आराखड्यात सदर काम समाविष्ट करण्याचे देखील आश्वासन दिले.
यावेळी बांदा भाजपाचे शैलेश केसरकर,बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, बुथ अध्यक्ष राकेश केसरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.