You are currently viewing युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांचे उपोषण स्थगित

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांचे उपोषण स्थगित

देवगड :

किंजवडे कदमवाडी बाईतवाडी रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन जि.प.बांधकाम विभाग प्रशासनाकडून मिळाल्यामुळे २६ जानेवारी रोजी करण्यात येणारे उपोषण स्थगित करीत असल्याची माहिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी दिली. मात्र मागणीनुसार काम झाले नाही तर उपोषण करण्याचा इशारा टेंबुलकर यांनी दिला.

जामसंडे येथील काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर बोलत होते. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, युवक तालुकाध्यक्ष सुरज घाडी उपस्थित होते.किरण टेंबुलकर म्हणाले, ७ जानेवारी रोजी जि.प.बांधकाम उपविभाग देवगड यांना निवेदन देवून जिल्हा वार्षिक योजनेमधुन मंजुर झालेला किंजवडे कदमवाडी बाईतवाडी रस्ता कामाचे लाईन आऊट प्रत्यक्ष ग्रामस्थांसमोर देवून अंदाजपत्रकाप्रमाणे पुर्ण करावा.

आमच्या मागणीनुसार रस्त्याचे काम करण्यात यावे अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता.यानंतर जि.प.बांधकाम उपविभाग देवगड चे उपअभियंता श्री.महाले, शाखा अभियंता श्री.पाटील यांच्याशी चर्चा झाली.त्यांनी मागणीनुसार काम करण्याचे आश्वासन दिल्यामुळे २६ जानेवारी रोजी करण्यात येणारे उपोषण स्थगित करीत असल्याचे टेंबुलकर यांनी सांगीतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा