किंजवडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा :
प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेड साठी विशेष अतिथी म्हणून सरपंच श्री. संतोष किंजवडेकर यांना विशेष निमंत्रण
देवगड
प्रजासत्ताक दिन 2025 च्या दिल्ली येथील परेड साठी केंद्र शासनाच्या सूचनानुसार महाराष्ट्र राज्यातील 34 ग्रामपंचायत सरपंचांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक ग्रामपंचायत सरपंच अशा पद्धतीने ही निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून किंजवडे ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष किंजवडेकर यांची दिल्ली येथील परेडला उपस्थित राहण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
केंद्र व राज्य स्तरावर आयोजित विविध अभियानात किंजवडे ग्रामपंचायतीने दिलेले प्रभावी योगदान आणि उल्लेखनीय कामगिरी यामुळे दिल्ली येथील परेड साठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळत असल्याचे मत श्री. संतोष किंजवडेकर यांनी व्यक्त केले आहे.
या अभियानातील प्रभावी योगदानासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ, चाकरमानी,महिला बचत गट,सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले आहे. त्यामुळे या अभिमानाच्या प्रसंगी या सर्वांचे आभार मानणे आवश्यक आहे असे कृतज्ञतापूर्वक उदगार सरपंच मा श्री. संतोष किंजवडेकर यांनी काढले आहेत.