शिरवंडे गावासाठी स्वतंत्र तलाठी सजा मंजूर व्हावी…
*शिरवंडे ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन सादर*
मालवण:
शिरवंडे गावची लोकसंख्या व महसूल विचारात घेता शिरवंडे गावासाठी स्वतंत्र तलाठी सजा मंजूरी व्हावी. अन्यथा असरोंडी सजा जोडून मिळाल्यास सोयीचे होईल. अशी मागणी भाजपा पदाधिकारी व शिरवंडे ग्रामस्थांनी तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिरवंडे ग्रामपंचायत सदस्य तथा युवा भाजपा कार्यकर्ते रघु गावकर यांनीही तहसीलदार वर्षा झालटे यांना शिरवंडे गावातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता तलाठी सजे बाबत स्वतंत्र निवेदन यावेळी दिले.
यावेळी भाजपा कुडाळ मालवण संयोजक तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी उपसभापती राजू परुळेकर, चंद्रकांत गावकर, सुरेश गावकर, लक्ष्मण घाडीगावकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, शिरवंडे हा गाव असरोंडी सजा तलाठी कार्यालयास गेली अनेक वर्ष जोडला आहे. परंतू सन २०२२ मध्ये ही सजा बदलून शिरवंडे गाव किर्लोस तलाठी सजेस जोडण्यात आला. त्याप्रमाणे किर्लोस व शिरवंडे एकत्र व असरोंडी व आंबवणे गाव एकत्र सजा मंजूर झाल्या आहेत. नविनच मंजूर झालेल्या किर्लोस तलाठी कार्यालयात किर्लोस व आंबवणे हे गाव जोडणे गरजेचे होते व असरोंडी व शिरवंडे हे गाव एकत्र राहणे गरजेचे होते. गावच्या भौगोलिक रचनेनुसार व दळणवळणाच्या दृष्टीने लोकांना ते सोयीचे झाले असते. मात्र तसे झाले नाही. याचा परिणाम म्हणजे शिरवंडे गावच्या शेतकरी, ग्रामस्थांना किर्लोस येथे जाणे गैरसोयीचे होत आहे. तरी असरोंडी सजा केल्यास ते सोयीचे होईल. अन्यथा शिरवंडे गावची लोकसंख्या व महसूल विचारात घेता शिरवंडे गावासाठी स्वतंत्र सजा मंजूरीचा प्रस्ताव केल्यास त्याचे ग्रामस्थांकडून स्वागतच होईल. तरी नियमानुसार योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी. असे निवेदनात म्हटले आहे. यावर तहसीलदार श्रीमती झालटे म्हणाल्या, याबाबत निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जातो. आपले निवेदन पाठवले जाईल. आपणही पाठपुरावा करा. यानंतर रघु गावकर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे सांगितले.