*”गदिमा हे शून्यातून स्वत:चे विश्व निर्माण करणारे प्रतिभावंत!” – डॉ. विठ्ठल वाघ*
*राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सव संपन्न*
पिंपरी
“गदिमा हे शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे प्रतिभावंत होते. असा एकही विषय अथवा रस नाही की जो गदिमांच्या कवितेत नाही!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ यांनी गणेश इंटरनॅशनल स्कूल, नेवाळेवस्ती, चिखली येथे मंगळवार, दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी काढले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, आशिया मानवशक्ती विकास संस्था आणि गणेश इंटरनॅशनल स्कूल यांनी आयोजित केलेल्या ३२ व्या राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सवात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. विठ्ठल वाघ बोलत होते. गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ कविवर्य अशोक नायगावकर यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, स्वागतप्रमुख एस. बी. पाटील, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष श्रमश्री बाजीराव सातपुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. जीवनगौरव पुरस्कारार्थींना सुवासिनींकडून विधिवत औक्षण, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, मानवस्त्र, शाल, पुष्पगुच्छ प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचबरोबर कालिका बापट (गदिमा काव्यसाधना पुरस्कार), संगीता सूर्यवंशी (गदिमा लोककला पुरस्कार), राजन लाखे (गदिमा शब्दप्रतिभा पुरस्कार), अनंत राऊत (गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार), देवा झिंजाड यांना ‘एक भाकर तीन चुली’ या कादंबरीसाठी मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ (मृत्युंजय साहित्य पुरस्कार) तसेच राजेश गायकवाड (‘बिन चेहर्याच्या कविता’), आनंद पेंढारकर (‘मी एक बोन्साय’), संदीप काळे (‘सईच्या कविता’), माधुरी विधाटे (‘मल्हारधून’), मीना शिंदे (‘दीवान – ए – मीना’), निरुपमा महाजन (‘शांत गहिर्या तळाशी’) यांना कवितासंग्रहासाठी गदिमा साहित्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गदिमा दिवाळी अंक पारितोषिकासाठी ‘अधोरेखित’ (प्रथम) आणि ‘हंसा’ (द्वितीय) या अंकांच्या संपादिका डॉ. पल्लवी बनसोडे आणि प्रिया कालिका बापट यांना सन्मानित करण्यात आले. काव्यमहोत्सवात शोभा जोशी, प्रतिमा काळे, रशीद अत्तार, देवेंद्र गावंडे आणि सुरेश वाघचौरे यांना ‘गदिमांचे वारसदार कवी’ म्हणून सन्मानित करण्यात आले. कविवर्य माधव पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आनंद माडगूळकर यांनी, “गदिमांचे साहित्य हे पंढरपुरासारखे आहे. साहित्याचे अनेक प्रवाह त्यांच्या साहित्यात होते. उभरत्या प्रतिभावंतांना गदिमांच्या नावाने पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते ही स्तुत्य बाब आहे!” असे विचार मांडले. रविराज इळवे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
पुरस्कारानिमित्त डॉ. श्रीपाल सबनीस यांनी, “मानवतावादाचा अर्क म्हणजे गदिमा होय! गदिमा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानदंड आहे. त्यांची कविता कळली म्हणजे महाराष्ट्र कळला. काव्यमहोत्सवाच्या माध्यमातून गदिमांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचे कार्य केले जात आहे!” अशा भावना व्यक्त केल्या. अशोक नायगावकर यांनी पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन गंभीर कविता सादर करून अंतर्मुख केले आणि नंतर ‘शाकाहार’ या हास्यकवितेच्या सादरीकरणातून उस्फूर्त हशा अन् टाळ्या वसूल केल्या. राजन लाखे यांनी गदिमांच्या कवितेचे अभिवाचन केले; तर अनंत राऊत यांनी, “मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…” या आपल्या लोकप्रिय गझलेच्या प्रभावी सादरीकरणाने श्रोत्यांमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. आनंद पेंढारकर (‘मी एक बोन्साय’), माधुरी विधाटे (‘ज्ञानेश्वरी’), मीना शिंदे (‘गझल’), निरुपमा महाजन (‘जत्रा’), डॉ. राजेश गायकवाड (‘आई’), संदीप काळे (‘माणूस’), डॉ. पल्लवी बनसोडे (‘बाईपणाच्या खुणा’), कालिका बापट (‘पाऊस’) आणि डॉ. विठ्ठल वाघ (‘ओलित’) या वैविध्यपूर्ण आशयगर्भ कवितांनी रंगतदार झालेल्या कवितामहोत्सवात संगीता सूर्यवंशी यांनी आपल्या सळसळत्या लावणीनृत्याने अनोखे रंग भरले.
सरस्वतीची प्रतिमा अन् वृक्षपूजन करून तसेच कामगारभूषण राजेंद्र वाघ यांनी गायलेल्या “एक धागा सुखाचा…” या गदिमागीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून, “पुण्यात गणपतीऐवजी मी गजानन अर्थात गदिमा यांना पाहायला आलो अन् पुण्यातच स्थायिक झालो. बत्तीस वर्षांपासून होत असलेल्या गदिमा कवितामहोत्सवात मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ कादंबरी लेखनासाठीही पुरस्कार प्रदान केला जातो!” अशी माहिती दिली. महेंद्र भारती, अरुण गराडे, जयश्री श्रीखंडे, सुप्रिया सोळांकुरे, मानसी चिटणीस, जयवंत भोसले, एकनाथ उगले, प्रभाकर वाघोले, महेंद्र खिरोडकर, प्रदीप बोरसे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले.
प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२