*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विकू नका हो….*
विकू नका हो विकू नका गहाण कुठेही राहू नका
नातलग नि कुळास आपल्या मुळीच बट्टा लावू नका..
बांडगूळ चढते झाडावर शोषण करते झाडाचे
बांडगुळ हो बनून कधीही परजीवी ते होऊ नका…
कर्तृत्वाने जागा आपली आपण निर्माण करावी
व्यर्थ वल्गना उगाच बडबड लुडबुड कोठे नसावी
मानहानी होते जगी आणखी मनातूनच उतरतो
सुज्ञ असे तो पाणी ओळखून स्वत:स मग तो सावरतो…
न्याय हाच हो जगी चालतो कर्तृत्वाने जग चाले
ना तर घंटा श्वानाच्या हो गाडीखाली ती हाले
माझ्यामुळे ती गाडी चालते भ्रम तयाला मग होतो
उत्तरोत्तर गर्ते मध्ये खाली खाली तो जातो…
वकूब आपला आहे जेवढा त्यात समाधान मानावे
चमचेगिरीने नाचक्की ती मनी आपल्या जाणावे
हाव नेई रसातळाला हातीचे ही मग जाते
गढूळ होते मनामनातील होते मग जे, होते नाते..
स्वाभिमाने वर्तावे हो अस्मितेसही जपावे
किंमत करून कमी आपली अधोगतीस ना जावे
दैवाने जे दिले आपणा कष्टाने ते वाढवावे
जे जे आपले नाही त्यावर नाव कधी ना कोरावे…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)