*ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी, शिवसेना नेते आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली बैठक*
*तांत्रिक परवानग्यांची मागणी;जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मकता*
सिंधुदुर्गनगरी :
चिपी विमानतळावरून चिपी मुंबई विमान सेवा बंद असून इतर ठिकाणी सुरु असलेली विमानसेवा देखील नियमित सुरु नाही त्यामुळे चिपी विमानतळ बंद होण्याच्या स्थितीत आहे. सत्ताधारी नेते चिपी विमानतळाच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी विमानसेवेत सुधारणा न झाल्यास चिपी विमानतळावर आंदोलन करून कुलूप लावण्याचा इशारा दिला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे चिपी विमानतळ चालविणाऱ्या आयआरबी कंपनीचे संचालक किरणकुमार, व्यवस्थापक कुलदीप सिंग, टर्मिनल व्यवस्थापक श्री राव यांच्यासमवेत शिवसेना नेते आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची आज बैठक झाली.
या बैठीकीत आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नव्याने यंत्रणा उभारून नाईट लँडिंग विमान सेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. चिपी विमानतळावर जास्तीत जास्त विमाने उतरवून प्रवाशांना सुरळीत सेवा देऊ अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांच्या समक्ष आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी यांनी दिली. त्यासाठी काही तांत्रिक परवानग्या आवश्यक असून त्या परवानग्या मिळाव्यात अशी मागणी देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून त्या परवानग्या देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. शिवसेना नेत्यांनी देखील त्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, सुशील चिंदरकर, बाबू आसोलकर, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.