*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*एक क्षण त्यांच्या साठी*
सृष्टीसाठी दरवर्षी नव्या ऊत्साहात पुन्हा पुन्हा वसंत येतो.
न ऊ रंग ऊधळत येतो. गुलाबी, पोपटी बाळ पालवी ठिकठिकाणी झाडा झुडपांवर डोकाऊ लागते. काहीच दिवसात पांगारा, कांटेसावर लाल रंगात माखु लागतात. पानोपानी कळ्या फुले डोलू लागतात. आंब्याला मोहोर येतो व कोकिळेला साद घालतो. वसंताच्या स्वागताचे बाळ कैर्यांचे तोरण लटकू लागते. फणस पपया अननस रातांबे लगडू लागतात
जांभळाला पांढरा मोहोर येतो व करवंदे जांभळे काळा जांभळा रंग चढवतात .मोर घननीळ रंगात हलकेच पदन्यास करत ऊगाचच रूबाब मिरवतो. शुभ्र कूंद, जाई जुई मोगरा तगर पानोपानी बहरतात.
या दिवसात आभाळही निरभ्र निळसर असते.
अंगणात अबोली गुलबक्षी लिली कर्दळी आपले रंग मिरवत असतात. राजा सोनचाफा आपला रंग रूबाब व सुगंध सगळेच दिमाखात मांडतो.
गुलाबाचे काय?किती रंग आणि किती आकार?
निसर्ग असा चैत्रगौरीसाठी सज्ज होतो. चैत्र गौर फुलांच्या मखरात बसते.कलिंगडाचा लाल रस ऊसाचा रस काकड्या टरबुजे यांची नुसती चैन तिच्यापुढे केलेली असते.
वसंत व चैत्रगौर यांची जोडी जमते. आंबट चवदार डाळ, मधुरपन्हे, चटपटे हरभरे … नुसती लयलुट असते.
पण बहावा पिवळी हळद माखुन येतो…. सोनसळी बहरतो व ग्रीष्म आल्याची चाहुल घेऊन येतो.
पाठोपाठ गुलमोहर लालंलाल रंगात फुलून येतो व चैत्रगौरीला निरोपाचे हळदीकुंकवाचे सडे घातले जातात. वसंतही सृष्टीचा निरोप घेतो पण पुन्हा येण्याचे वचनही देतो.
शिशिरही पानगळतीचा असला तरी वसंत येईल ही ग्वाही सृष्टीला सांगत येतो व जातो.
म्हणुन सृष्टीची रूपे सदैव वेगवेगळी दिसतात व त्यांत शाश्वती असते. स्थिरता असते.
पण सजिवाचे असं नाही. त्याच्या आयुष्यात प्रत्येक ऋतू एकेकदाच येतो. हेमंतात तो तारूण्यात येतो… शिशिरात संघर्ष करत आपले नको ते रंग आवड स्वभाव त्यागुन छान असा तजेलदार रूबाबदार होतो. आता त्याच्या आयुष्यात नवरंग खेळत वसंत रंगपंचमी साजरी करतो. व त्याचे जन्माचे सार्थक होते. मुलंबाळं घर दार हौसमौज लग्नकार्ये सगळंच आनंदाचे घडून येते.
हळूहळू वसंत निरोप घेऊन ग्रिष्माचा तडाखा जाणवू लागतो.
एकेक वर्ष सरू लागते. पाने पिवळी होत सुकायला लागतात. ताकद नाहीशी होते. पैसा तुटपूंजा पडतो.
रूप विद्रुप होते. व्याधी मागे लागतात. एकूणच पाऊल मागे पडायची सुरवात होते.
आता या पिवळ्या सुकल्या पानांची किंमत शुन्य होते. परिस्थिती ऊनाड वार्यासारखे गरगर फिरवत ठेवते.पाने फुले फळे नसलेले हे वृक्षराज पूर्ण असहाय व अगतिक होतात. सगळे दूर जातात. एकटेपण खायला येते. मृत्यूची भिती, काळजी लागते. पण ते सगळ्या परिस्थितीला तोंड देत जगत असतात.
आता कोणताच ऋतू त्यांच्या आयुष्यात येणार नसतो. आयुष्यातली कर्तव्ये पूर्ण करत वसंतातली रंगपंचमी संपवून पैलतीरावर नजर लाऊन परतीची वाट चालू लागतात. त्यांना काही द्यायचं घ्यायचं नसतं.
कूठे कोणाला ते हवेसे असतात व भरल्या घरात असतात तक्ष कोणाला ते नकोसे असतात मग कूठेही पोचवले जातात.
वर चढलं कि खालची शिडी ढकलून द्यायची हा निसर्ग नियमच आहे. ही पिवळी पाने वृक्षाला कसेबसे जीव चिकटवून जगत असतात. कोणी त्यांना पिवळी पाने तर कोणी डस्टबीन तर कोणी ओल्ड फर्निचर म्हणतात.
खुप वाईट वाटतं ऐकून. जगू देना त्यांना आनंदात.
बसा क्षणभर त्यांच्याजवळ. बोला दोन शब्द कृतज्ञतेचे मायेने.
हातात हात घेऊन त्यांचा खरखरीत पण अमृताचा स्पर्श व माधुर्य देणारा स्पर्श अनुभवा.
कधी बोलता बोलता समाधानाने हातातुन हात गळुन पडेल कळणारही नाही.
त्यांना पैशावरून बोलू नका . आजवर त्यांनी जे तुमच्यासाठी केले व ठेवले आहे ते तुम्ही परत फेडूच शकणार नाही.क्षुल्लक गरजा असतील पण त्याही सारून केव्हाही पैलतिरावर अलगद पोचतील
मोठ्याने बोलतात. तर बोलू दे. काय हवं ते करू दे. कधीतरी अचानक आवाज थांबेल मग मात्र त्यांच्या … ‘बाळा ‘ … या हाकेसाठी कितीही जीव तडफडला तरी फोटोतुन ते हांक मारायला नाही येणार.
आत्ता खाण्यावरून बोलायचं व नंतर थाटामाटात श्राद्ध करायचं. किती हा जिवघेणा वेडेपणा आहे! कधीतरी आहेत तोच घट्ट मिठी मारा. स्पर्श पुन्हा पुन्हा अनुभवा. या तुमच्या मायेमुळे त्यांच्या व्याधी सुसह्य होतील.
आता वसंत तर कधीच संपला आहे. हा शिशिर कधी ही पिकली पिवळी पाने गाळेल सांगता येत नाही. पुन्हा न येणार्या परतीच्या वाटेला समाधानाने लागतील. तोपर्यंत जपायलाच हवीत. त्यांच्या वसंतात त्यांनी तुम्हाला जपलं नसतं तर?
जुनी वस्त्र नाही का जीर्ण होतात. पण ती भरजरी जरतारी असतील तर ती आपण जिवापाड जपतो. एखादी मायेची गोधडी, जुना शेला, शालू, नक्षीची टोपी एखादीची काळी चंद्रकळा … आपण किती जपतो.कारण त्यांत आपल्या मायेच्या , साखरी किनार्याच्या गोड आठवणी लपलेल्या असतात. मग ही सुद्धा अशी भरजरी जरतारी पण जीर्ण झालेली वस्त्रे आहेत. टाकायची का?
त्यांना भरजरी वस्त्र म्हणुन त्यांचा गौरव केला पाहिजे.
एक क्षण त्यांच्यासाठी ठेवायलाच पाहिजे.
भरजरी अमानत मानली पाहिजे. जपलं पाहिजे त्यांना.
अनुराधा जोशी.
अंधेरी 9820023605

