You are currently viewing दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत राज्य मंडळाचा मोठा निर्णय

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत राज्य मंडळाचा मोठा निर्णय

पुणे :

शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. होऊ घातलेल्या दहावी – बारावीच्या परीक्षांच्या पार्श्भूमीवर त्यांनी कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा केंद्रांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षेत आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत. त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती त्या केंद्राव्यतीरिक्त अन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करावी, असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे.राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २० ते २६ जानेवारी दरम्यान ‘कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह’ आयोजित केला आहे.

 

शिक्षक हे परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक

राज्यात दहावी-बारावी या दोन्ही परीक्षांमध्ये एकूण सुमारे ३१ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान, कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने हे आदेश दिले आहेत. सध्याच्या पद्धतीनुसार परीक्षा केंद्रावर त्याच शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक हे परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कामे करतात. आत यंदापासून यात बदल होणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित कर्मचारी अन्य शाळांतून नियुक्त करण्याचा निर्णय राज्यस्तरावरून पहिल्यांदाच घेण्यात आल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

 

‘कॉपीमुक्त परीक्षांसाठी जनजागृती सप्ताह’

या सप्ताहात कॉपीमुक्त अभियानाची शाळास्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक यांना माहिती देणे, कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेणे, कॉपी केल्यास होणाऱ्या शिक्षेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे, परीक्षा काळातील आहार, आरोग्याच्या काळजीबाबत तज्ज्ञांद्वारे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग,तणावमुक्त वातावरणात परीक्षा देणे, उत्तरपत्रिका कशा लिहाव्यात याबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन, कॉपीमुक्त अभियानाबाबत जनजागृती फेरी, ग्रामसभा असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा