नेमळे येथे महामार्गावर मासे वाहतूक करणारा कंटेनर पलटी
चालकाचा मृत्यू : एक जण बचावला
सावंतवाडी :
चालकाला झोप लागल्याने कंटेनर रस्त्यालगत पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसरा चालक या अपघातात बालबाल बचावला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक येथून गुजरातच्या दिशेने मासे वाहतूक करणारा कंटेनर झाराप – पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना चालकाला झोप आल्याने कंटेनर रस्ता सोडून बाजूला गेला व सुमारे २० फूट खोल खाईत पलटी झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला.
नेमळे कुंभारवाडी येथे शनिवारी पहाटेच्या चारच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने या चालकासोबत असलेला दुसरा चालक अपघातात बचावला आहे. या अपघाताची सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.