You are currently viewing जर तर च्या गोष्टी

जर तर च्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम लेख*

 

*‘जर तर च्या गोष्टी’*

 

” कल्पना अगं आपलं पेंडिंग असलेलं ऑफिसच प्रोजेक्ट पूर्ण करायला एकत्र बसायचं ठरवलं होतं न आपण काल ! जास्त वेळ ऑफिस मधे थांबून दोघी मिळून ते पूर्ण करूनच जायचं या तयारीने मी आले होते. पण तू तर काल दांडीचं मारलीस चक्क !” वसुधा नाराजीनेकल्पनाला म्हणाली! योग्य उत्तराची अपेक्षाचं नव्हती! मोलकरणीची दांडी, ऐन वेळी आलेले पाहुणे, एक ना हजार कारणाची यादी फेकली असती कल्पनाने वसुधाच्या तोंडावर!

खरच!

माझ्याकडे ‘हे’ नाही माझ्याकडे ‘ते’ नाही, ‘अशी अडचण आली तशी अडचण आली’ असं म्हणायची सवयच आहे वसूच्या मैत्रिणीला.

तशी ती खूप जणांना असते म्हणा .

 

‘मला अमुक मिळालं असतं तर मी तमुक झालो असतो!’ असं देखील खूपदा म्हटलं जातच की!

‘मला देवानी सुंदर रूप दिलं नाही! म्हणून सामान्य घरात पडायची वेळ आली’ असं करावादून म्हणणाऱ्या बायका दिसतातच.

 

‘उंची थोडी अधिक असती तर! चांगला सैन्यात, पोलिसात गेलो असतो न!”

 

“पैसा नाही गाठीला हो! वाडवडीलांच काही म्हणून काही आर्थिक पाठबळ नाही आलं गाठीला! म्हणून तर मला माझा स्वतंत्र व्यवसाय करता आला नाही!”

 

“घरची श्रीमंती नाही, देखणं रूप नाही, म्हणून मित्र मैत्रिणी माझ्यापासून दूर राहतात.”

 

” शिक्षणात मोठी उडी घेता आली असती. पण काय करणार…! बुद्धी देताना देवाने हात आखडता घेतला न!म्हणून!” आणि त्यात माझ्यासाठी वशिला लावणारं तरी कोण आहे!नाहीतर कुठल्या कुठे पोचलो असतो! या अशा जर तर च्या गोष्टी करत शेखचिल्ली बाता मारणारे देखील खूप दिसतात सभोवती! कधी कधी याला आपण तरी कुठे अपवाद असतो! अपयशच समोरं आलं की आपण कुठे कमी पडलो, काय चुकलं यांच आत्म निरीक्षण करायचं सोडून आपला रोख असतो तो वाटेत आलेल्या अडचणी आणि अडथळे या कडे. पण यात आपल्या त्रुटी बघायचं लक्षातच येत नाही.खूपदा आपण आरंभशूर असतो.एखादा नवा संकल्प केला जातो तो मोठ्या आवेशाने! आणि कालांतराने लक्षात येत हे कामं आपल्याला झेपण्याच्या पलीकडचं आहे! मग ते अपूर्णच रहात. कारण आपलं नियोजित लक्ष्य साधण्यासाठी गरजेचं असलेलं पूर्व नियोजन करायचं साफच राहून गेलेलं असतं!

 

असं का बरं होतं असेल? कष्ट करायची तयारी नसते? की तितकी कणखर वृत्तीचं नसते बालपणपासून रुजलेली! की कौशल्याचा आणि पूर्व ज्ञानाचा आभाव असतो?

का सतत कोणाच्यातरी सहाय्याची अपेक्षा करायची सवय जडलेली असते? कदाचित तसच असावं. बालपणापासून आपल्या मुलाबातीत कणखर, अगदी प्रसंगी निर्दयी वाटेल अशी भूमिका घेणारी सानेगुरुजीच्या शामची आई सारखी आई विरळाच!

आजकाल तर काय! आपल्या मुलांना किती सोई सुविधा पुरवू, किती धन त्यांच्या साठी ठेवू या विचाराने आई वडील १२ ते १४ तास नोकरी व्यवसायात दंग. मग मुलांना वेळ देता येत नाही तर दे मोबाईल दे खेळणी, दे कपडे. राहतं काय द्यायचं! तर संस्कार! यश मिळवण्यासाठी करायाच्या कष्टाचे संस्कार द्यायलाच पालक विसरतात. आणि मग पुढे तीच मुलं ‘जर तर ‘च्या बाता मारायला लागतात.

 

🖊️अंजना कर्णिक

प्रतिक्रिया व्यक्त करा