You are currently viewing कोण आपण…

कोण आपण…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कोण आपण ….*

 

कोण आपण वकुब आपला आपण जाणून घ्यावे

वसुंधरेचे कीर्तिमान ते आपण कुठे पहावे

सागरातील थेंबच आपण गर्वाचे घर खाली

काट्यांनी का वसुंधरा ती कधी सुखी झाली?..

 

भान असावे जगण्याचे हो स्वाभिमान वर्तावा

माणूस म्हणूनी मूल्य आपुले माणूस का हो विकावा?

दास्य कुणाचे नेई लयाला कर्णच होतो त्याचा

चाक अडकता कर्दमात ते कृष्ण सखा बरसावा…

 

दास्याला ना मान कुठे ही होते कुचेष्टा जनी

भीक न मागे राहे उपाशी नेहमी तो अभिमानी

लाचारी ती..! छे.. छे.. जगणे अर्थशून्य जीवन

मन आपुले असते ग्वाही नको दुजा कोण…

 

गहाण टाकू नये जीवना कधी कुणाही पुढे

गहाण पडता माणूस मरतो फक्त राहते मढे

किंमत आपुली राखावी हो घरीदारी सर्वत्र

सुज्ञ म्हणूनी वर्तावे ते जीवनास हो पात्र…

 

सुज्ञाला ना लागे सांगणे नातरी समजा मूढ

उकलावे हो आपले आपण जीवनातले गूढ

आनंदच हो आपण सारे शोधू नका बाहेर

देह आपला मंदिर आहे परमेश्वराचे घर …

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा