मेट्रो कारशेडसाठी कांजूर मार्ग जागेला मिळालेल्या स्थगितीनंतर मुंबईकरांच्या हितासाठी अन्य जागांचा पर्याय शोधण्यासाठी समितीने नेमण्यात आली. मुख्य सचिव संजय पुमार यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण ९ सदस्यीय समितीने मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी आज पाहणी दौरा केला. पुढील आठवडय़ात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
मेट्रो कारशेडसाठी नवी जागा शोधण्यासाठीच्या समितीत मुख्य सचिव संजय पुमार, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, मुंबई महापालिका आयुक्त, कोकणचे विभागीय आयुक्त, परिवहन आयुक्त, मुंबई मेट्रोचे सहव्यवस्थापकीय संचालक, आयआयटी मुंबईचे प्रा. के.व्ही. कृष्णा राव, डायरेक्ट वर्क्स मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे प्रमोद आहुजा आणि अतिरिक्त महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सोनिया सेठी यांचा समावेश आहे.
कांजूर मार्ग , आरे , कलिना , बीकेसीतील जागांची पाहणी
कांजूर मार्ग, आरे, कलिना आणि बीकेसीच्या प्रस्तावित जागांचा या वेळी आढावा घेण्यात आला. मेट्रो तीन आणि सहा यांच्या मार्गिकेचे एकत्रीकरण सुलभ करणे शक्य आहे का, यासाठी अंदाजित खर्च आणि कालावधी या बाबी तपासणे. कांजूर मार्ग येथील जागा आरेपेक्षा सुयोग्य आहे का, याची तपासणी करणे. मेट्रो 3, 4 आणि 6 यांच्या कारशेडसाठी कांजूर मार्ग येथे जागा पुरेशी आणि सुयोग्य आहे का, याचा तपास करणे या बाबींचा सविस्तर अहवाल समिती राज्य सरकारला सादर करणार आहे.