37 वा व्यापारी एकता मेळावा 31 जानेवारी रोजी अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर होणार साजरा
माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा व्यापारी संघटनेच्या वतीने होईल भव्य नागरी सत्कार
वैभववाडी
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने 37 वा व्यापारी एकता मेळावा 31 जानेवारी 2025 रोजी वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर संपन्न होणार आहे. या मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे महासंघाचे विविध पुरस्कारांची घोषणा महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर व कार्यवाह नितीन वाळके यांनी वैभववाडी येथे व्यापारी मेळावा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावर्षीचा व्यापारी महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार वैभववाडी येथील ज्येष्ठ व्यापारी टी. एस.घोणे उर्फ घोणे मामा यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच महासंघाचे संस्थापक बाईसाहेब भोगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा युवा व्यापारी पुरस्कार वैभववाडी येथील काजू उद्योग व्यापारी नयन मोरे यांना तर माई ओरोसकर स्मृती पुरस्कार वैभववाडी येथील महिला व्यापारी सुलोचना नामदेव भोवड यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच कै. बापू नाईक स्मृती पुरस्कार पर्यटन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या परुळे येथील माचळी रिसॉर्टचे संस्थापक भैय्याजी सामंत यांना तर आदर्श व्यापारी तालुका अध्यक्ष कुडाळ येथील श्रीराम शिरसाट यांना जाहीर करण्यात आला आहे तर महासंघाचे कै. प्रतापराव केनवडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श ग्रामीण व्यापारी संघ व उमेश शिरसाठ स्मृतीस प्रित्यर्थ देण्यात येणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी घोषित करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कार प्राप्त व्यापाऱ्यांना खासदार नारायण राणे मंत्री नितेश राणे व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यशोगाथा दाखवनारी शॉर्ट फिल्म यावेळी दाखवण्यात येणार आहे.
31 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता दत्त मंदिर वैभववाडी ते अराविद्यालय वैभववाडी अशी भव्य शोभायात्रेने करण्यात येणार आहे. सकाळी ठीक 10:30 वाजता व्यापारी एकता मेळाव्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध कवी व प्रेरणादायी वक्ते म्हणून प्रसाद कुलकर्णी यांचे यशस्वी होण्याचा मार्ग या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे विनोद मिस्त्री व अतिश कुलकर्णी यांचा प्रेरणादायी परिसंवाद यामध्ये कार्पोरेट शिवाजी महाराज,मिशन अफजलखान या विषयावर हमखास यशाचा मार्ग याविषयी युवा व्यापाऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे श्रीकांत पाटील युवा उद्योजकांना स्टार्टअप इंडिया बाबत मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बोलताना नितीन वाळके म्हणाले वैभववाडी तालुका व्यापारी संघाच्या वतीने यावर्षीच्या व्यापारी एकता मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून हा मेळावा भव्यदिव्य वैभववाडीच्या नावाप्रमाणे वैभवशाली होईल यात शंका नाही. असा विश्वास वाळके यांनी यावेळी व्यक्त केला. या मेळाव्यातून नवउद्योजकांना काही नवीन करण्याची प्रेरणा मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, दीपक भोगले, वैभववाडी तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर, सचिव सुरेंद्र नारकर, खजिनदार नितीन महाडिक, उपाध्यक्ष अरविंद गाड, संजय लोके, मनोज सावंत, अबू पारकर,रत्नाकर कदम, वसंत पटेल, संतोष कुडाळकर, गणेश भोवड, यांच्यासह वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.