*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आली थंडी मुक्कामाला…*
आली थंडी मुक्कामाला जीव हुरहुर करे
जावे वाटे शेतामध्ये खावा हुरडा हरबरे…
अशी थंडी ही गुलाबी जीवघेणी येई कळ
सखा राहिला हो दूर मनी वाटे हळहळ…
सय सख्याची दाटते येता आठवणी पूर
आज येईल का उद्या माझा बदलतो नूर
वाट पाहते दारात दाटे नयनात पाणी
सखा नसता घरात मनी सदा आणिबाणी…
शेते शिवारे फुलली हरबरा येई घाटी
पिवळ्या धम्मक त्या लोंब्या शिवाराच्या ताटी…
वाऱ्यावर सळसळे लहरी त्या सोनसळी
हिरव्या पिवळ्या रंगात खुलते ती माती काळी…
थंडीच्या त्या दिवसात धुके पहाडी उतरे
जग लुप्त होई सारे मनोहर दिसे सारे
जणू धुक्याची चादर लपेटली वसुंधरा
स्वर्ग धरा नि पाताळ सारे मिटवी अंतरा…
येतो सृष्टीला बहर आंबेमोहोर फुलतो
पानेपानी दरवळ जणू आनंद खेळतो
येई शेकोटीला बळ जागोजाग धुनी पेटे
असा थंडीचा महिना”उबदार” मोठा वाटे….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)