*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम लेख*
*पोंगल*
मंडळी, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा…
नवीन वर्ष सुरु झालं आणि आपण वाट पाहत होतो ती मकरसंक्रांत येऊन ठेपली देखील. तिळगुळाचे लाडू, हलवा, हळदीकुंकवासाठी खास काळी साडी, लुटायचं वाण, सुगडी हे आणि ते, यादी संपतच नाही. शिवाय घरात लहान बाळ असेल तर त्याचं बोरन्हाण करण्यासाठी हलव्याची बाळलेणी, चॉकलेट, बिस्कीटं, काळा ड्रेस याची तयारी करायची आणि एखादी नववधू असेल तर मग तिच्या साडीचा आणि तिच्या आणि तिच्या पतीच्यासुद्धा हलव्याच्या दागिन्यांचा थाट विचारूच नका. शिवाय बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, वांग्याची मिक्स भाजी, खिचडी यांची ही तयारी करावी लागतेच.
मंडळी, अशीच किंबहुना जरा जास्तच गडबड तामिळनाडूत ह्याच वेळेस आपणास नांवाने माहित असलेल्या
‘पोंगल’ या सणासाठी सुरू असते. खरं म्हणजे पोंगल याचा अर्थ खिचडी असा होतो. ती तिखट, साधी, किंवा गोड असू शकते. पोंगल हा सण निसर्गाचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि त्यांच्यासाठी राबणाऱ्या पशुधनाचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यात येतो. त्यामुळे मुख्यतः हा शेतकऱ्यांचा जरी सण असला तरी तो आतां शहरातही तितक्याच उत्साहानं साजरा करतात.
मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये भिन्नधर्मीय, बहुभाषिक लोक रहातात, त्यांनाही तेथील संस्कृतीची माहिती होते. पोंगल बनवण्याच्या, रांगोळीच्या स्पर्धाही घेतल्या जातात. दुकानांमध्ये वेगवेगळे सेल लागलेले असतात आणि अवघी जनता उत्साहाने खरेदी करत असते.
या महिन्यात तामिळनाडूतील ऊस आणि भात ही मुख्य पिके तयार होतात. शेतकरी आनंदात असतो. त्याला ईश्वराच्या, भूमातेच्या, गाई-बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची असते. या सुमारास उत्तरायण सुरू होऊन सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असतो. तमिळ महिन्यातील ‘तई’ नामक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजे जानेवारी महिन्याच्या १४ तारखेपासून तीन ते चार दिवस पोंगल साजरा करतात.
पहिल्या दिवशी भोगी पोंगल असते. या दिवशी सूर्योदयापूर्वी घरातील काडीकचरा, अनावश्यक, तुटकं-फुटकं सामान, जुने कपडे घराबाहेर काढून जाळून टाकतात. घरासमोरील अंगण शेणाने सारवून घेतात आणि त्या आगीभोवती लोकसंगीत गात फेर धरून नाचतात.
दुसऱ्या दिवशी सणाचा मुख्य दिवस असतो. या दिवशी अंगणात पोंगलचे प्रतीक म्हणजे मातीचं गोल भांडं, त्यात उतू गेलेलं दूध, ऊस, गाय आदींची रेखाटने असलेली रांगोळी काढतात. त्या शेजारी मातीच्या स्वच्छ सारवलेल्या चुलीवर मातीचं भांडं ठेवतात. ते भांडं हळदीकुंकू आणि फुलांनी सजवलेलं असतं. नवीन तांदूळ, गाईचे दूध, गुळ घालून त्यात पोंगल शिजायला ठेवतात. नवीन वस्त्र घालून नटून सजून तामिळ स्त्रिया पोंगल करायला घेतात.
पोंगलचा तामिळ अर्थ ‘उफान’ असाही होतो. त्यामुळे पोंगल शिजवताना उफान आलं म्हणजे दूध उतू घातलं तर ते समृद्धीचं प्रतीक मानतातच पण आपले मनही त्या उफाणाप्रमाणे शुभ्र आणि शुद्ध असावे असा त्याचा अर्थ होतो.
तामिळ संस्कृतीत सूर्याला जगाचे उत्पत्तीकारक मानले आहे .त्यामुळे जेव्हा उत्तरायण सुरू होऊन सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्य पूजाही केली जाते. संध्याकाळी सगळे जण एकमेकांना पोंगल आणि शुभेच्छा देऊन सण साजरा करतात.
तिसऱ्या दिवशी बैलांची पूजा केली जाते. त्यांच्या शिंगांना रंगवून फुलांच्या माळा घालून सजवले जाते. गोड पोंगल आणि ऊस खाऊ घातला जातो. त्यांच्या स्पर्धाही घेतल्या जातात.
पोंगल तामिळनाडूतील वर्षभराच्या सर्व सणांच्या समाप्तीचा सण मानला जातो. समाजातील सर्व वाईटाचा अंत यावेळेस होतो असे मानतात.
आपल्याकडील वसुबारस, बैल पोळा, होळी, संक्रांत या सगळ्या सणांचे मिश्रण असलेला हा सण तामिळनाडूची मुख्य ओळख आहे.
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई.
©® या लेखाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.