*शेतकऱ्यांची फळपीक विम्याची १२ कोटी रु. रक्कम प्रलंबित*
*२८ जानेवारी पर्यंत रक्कम जमा न झाल्यास २९ जानेवारी रोजी शिवसेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडणार धरणे आंदोलन*
*कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा,काजू फळपीक विमा योजना सन २०२३-२४ मध्ये ४२१९० एवढ्या शेतकऱ्यांनी आंबा व काजू फळपीकांचा विमा उतरविला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचा १२ कोटी रु. हप्ता विमा कंपनीकडे जमा करण्यात आला होता.मात्र त्यापैकी आंबा पिकामध्ये ३ हजार शेतकरी व काजू पिकामध्ये साधारण ९०० शेतकऱ्यांना अद्यापही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामध्ये दोडामार्ग तालुक्यामध्ये तळकट, कोनाळ, कुडाळ तालुक्यामध्ये गोठोस, ओरोस बु.,मडगाव आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये निरवडे या सहा सर्कलमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची विम्याची सुमारे १२ कोटी रु रक्कम प्रलंबित ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा कृषि अधिक्षक, विमा कंपनीचे अधिकारी यांनी येणाऱ्या २८ जानेवारी २०२५ पर्यंत विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी. अन्यथा २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर,राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. यासंदर्भात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी देखील आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत. सरकराने आणि प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी व प्रलंबित फळपीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यादृष्टीने सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत अशी माहिती शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.