*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम लेख*
*अशा जगास्तव काय कुढावे*
आज १३जानेवारी. उद्या मकरसंक्रांतीचा दिवस. सोसायटीतील बायकांचा उत्साह ओसंडून वहात होता. आज भोगी होती. पार्किंगमध्ये भोगविड्यांचे हळदीकुंकू देता-घेता उद्याच्या मुख्य हळदी-कुंकू समारंभाची चर्चा रंगत होती. कोणती साडी नेसायची, नऊवारी कीं सहावारी? दागिने कोणते घालायचे? पेशवाई कीं आधुनिक? तिळाचे लाडू कीं वड्या? वाण कोणतं लुटायचं? एक ना दोन…
आपल्या घरांत खिडकीशी उभ्या असलेल्या रेवतीच्या कानांवर ही चर्चा सहजच पडत होती आणि तिच्या उदासीनतेत आणखीनच भर पडत होती. तिला मागच्या वर्षीची संक्रांत आठवली. ही अशीच चर्चा तेव्हांही रंगली होती. रेवतीला बोलवावं की नको या दबत्या स्वरांतील कुजबुजीचे रूपांतर, “नक्को बाई, अपशकुन कशाला, सवाष्णींचा सण हा” या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचेही तिला ऐकू आले होते. आतापर्यंत तिच्याशी सौजन्याने, सौहार्दाने वागणाऱ्या शेजाऱ्यांनी तिला एकदम परकं केलं होतं, आपल्या परिघाबाहेर लोटलं होतं.
रेवतीला तेव्हां खूप वाईट वाटलं होतं. ती स्वतःशीच खूप रडली होती. मुलांनी तिला विचारलं तेव्हा डोकं दुखण्याचं कारण देऊन त्यांचं समाधान केलं होतं. प्रत्यक्ष समारंभाच्या वेळी मात्र सगळ्या बायका खाली नटून-थटून जमल्या आहेत, हसून खेळून एकमेकींना हळदी कुंकू, तिळगूळ देत आहेत हे पाहून मुलांना रहावलं नाही. “आम्ही आईला बोलावून आणतो हं” असं त्यांनी म्हणताच, “अरे नको,नको” असा बायकांचा आवाज न ऐकतांच रेवतीला बोलवायला तीं दोघं घरी आली.
@भारती महाजन-रायबागकर
रेवती एकटीच अंधारात विमनस्कपणे बसली होती.
“आई अशी कां गं बसलीसअंधारात?”
“आई नवी साडी नेस नं, चल नं बाहेर, सगळ्या काकु जमल्याहेत बघ.”
“अरे,नको, माझं डोकं दुखतंय खूप.”
“आई,चल नं…तुला बरं वाटेल तिथे गेल्यावर…”
“नको म्हटलं ना, कळत नाही कां एकदा सांगितल्यावर, मी येणार नाही आणि तुम्हीही जायचं नाही. अभ्यास करा घरांत बसून.”
ती मुलांवर करवादली होती आणि मुलं बिचारी आपलं काय चुकलं हे न कळून भेदरलेल्या सशासारखी एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली होती.
तीन वर्षापूर्वी महेशचं अचानक निधन झालं तेव्हा ह्याच शेजाऱ्यांनी त्या धक्क्यातून सावरायला तिला सर्वतोपरी मदत केली होती. नंतरही तिच्या अडीअडचणींना धावून येत असत. तिला एकटं वाटू नये याची काळजी घेत. तिच्या मुलांसाठी आवर्जून खाऊ पाठवत. सोसायटीत राहायला आल्यापासुन महेश-रेवतीने आपल्या हसतमुखाने मदत करण्याचा स्वभावाने सर्वांना आपलंसं करून घेतलं होतं. सर्वांनाच ती दोघं हवीहवीशी वाटत.
पण आता सर्व चित्रच पालटलं होतं. महेश अकालीच निघून गेला असला तरी रेवती…ती तीच होती. पण अशा काही विशिष्ट प्रसंगी तिला वगळल्या जात होतं. सोसायटीतील कांही जणींना तिला आपल्यांत सामावून घ्यावं असं वाटतही असे, तसं त्या दबक्या स्वरांत बोलुनही दाखवत. पण…
धर्माचा, रुढी-परंपरांचा पगडा इतका घट्ट होता कीं…तिथे माणुसकी, सहानुभूती, संवेदनेला कांही स्थान नव्हतं. खरंच आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांविना स्त्रियांचं स्थान अजूनही असं उपेक्षित असावं? बहुतांशी सण, व्रतवैकल्यं फक्त पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठीच असावीत? स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतांना, स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतांना वेळ आल्यावर मात्र तो मुखवटा लगेच गळून पडावा? कां…कां…कां?
“बरंय, मग उद्या या गं सगळ्यांजणी वेळेवर” कुणीतरी मोठ्या आवाजांत बजावलं आणि “हो, हो” म्हणत त्या घरोघरी पांगल्या.@भारती महाजन -रायबागकर-त्या आवाजाने रेवती आपल्या विचारश्रुंखलेतुन बाहेर आली.
‘हं…म्हणजे उद्या पुन्हां मागच्या वर्षीचीच पुनरावृत्ती होणार तर…’ ती मट्कन खुर्चीवर बसली. तिच्या डोळ्यांसमोर मुलांचे केविलवाणे चेहरे उभे राहिले. काय करावं…
आणि थोड्यांच वेळात तिच्या चेहऱ्यावर एक निश्चय दिसुन आला. ‘असं केलं तर…बस्स् ठरलं…’
ती उठून स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करता करता तिच्या मनांत ऊद्याचे बेत ठरत होते. इतक्यांत मुलंही शाळेतुन आली. त्यांचं सगळं आवरून रात्री जेवतांना तिने त्यांना सांगितलं…
“चला, होमवर्क करून लवकर झोपा आतां. उद्या लवकर उठायचंय आपल्याला.”
“उद्या सुट्टी आहे आम्हाला. संक्रांत आहे ना!”
“हो, म्हणूनच तर… सरप्राईज आहे तुमच्यासाठी.”
“व्वाव्, सरप्राईज!”
दुसर्या दिवशी सकाळी उठून रेवतीने आपलं, मुलांचं आवरलं आणि घराला कुलूप लावून ती बाहेर पडली.
“आई, कुठे चाललोय आपण सकाळी सकाळी?”
“सुनो, बच्चे लोग! तुमची आई तुमच्यावर एकदम प्रसन्न आहे आज. बोलो, क्या चाहते हो?”
ती हसून म्हणाली.
“आईस्क्रीम आणि भेळ पुरी आणि चायनीज” मुलांनी एकच कल्ला केला आणि तिने रिक्षाला हात केला.
दिवसभर तिघांनीही खूप धम्माल केली. मुलांच्या आवडीप्रमाणे तिनं त्यांना मनसोक्त खाऊ घातलं. प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. एक छानसा मजेदार सिनेमा सुद्धां बघितला आणि संध्याकाळ होता होता-होता ते गार्डनमध्ये गेले.
मुलं लगेच खेळण्यांकडे वळली आणि ती एका बाकावर टेकली. आज गार्डनमध्ये फारशी वर्दळ नव्हती. बायका तर जवळपास नव्हत्याच. दिवसभराच्या धावपळीमुळे तीही जराशी दमली होती. पण तिचं मन मात्र पिसासारखं हलकं झालं होतं. नैराश्याला मनांत प्रवेश करायला वावच ठेवला नव्हता तिनं.
आज संक्रांतीचा सण होता. ऋतू संक्रमणाचा दिवस. संक्रमण म्हणजे बदल,परिवर्तन. आपल्या नकारात्मक विचारांचं सकारात्मक विचारांत तिनं संक्रमणच केलं होतं जणूं. ‘बरं झालं, आपण बाहेर जाण्याचा निर्णय घेतला ते.’ लांब खेळणाऱ्या मुलांकडे पाहत ती स्वतःशी म्हणाली.
“मी इथं बसले तर चालेल?”
एक साधारण तिच्याच वयाची स्त्री तिला विचारत होती.
“हो, हो, बसा नं, रेवतीने जरा सरकुन तिला जागा करून दिली. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या चौकशा झाल्यावर रेवतीनं तिला म्हटलं,
“एक विचारू, राग नाही ना येणार, आज संक्रांत, हळदीकुंकू सोडून तुम्ही…?
“आतां राग नाही येत कसलाच, आणि आमच्यासारख्यांसाठी कुठली हळद आणि कुठलं कुंकू!
“आमच्यासारख्या… म्हणजे… तुम्ही…?
“घटस्फोटीता आहे मी, एका मुलीची आई…ती बघा…ती माझी मुलगी…तिनं बोट दाखवलं.रेवतीने पाहिले तर एक ५-६ वर्षांची मुलगी तिच्याच मुलांबरोबर खेळत होती.
“हिच्या जन्मानंतर कांही दिवसांनी हिच्या वडिलांनी माझ्याशी घटस्फोट घेतला. त्यांचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम होतं म्हणे आणि आईच्या इच्छेखातर त्यांनी माझ्याशी लग्न केलं होतं. सासुबाईंना नातवंडांचं तोंड पहायचं होतं, तर ते पुत्रकर्तव्य पार पाडलं आणि मला घटस्फोट देण्याचा निर्णय जाहीर केला. त्या धक्क्याने सासुबाई गेल्या आणि…” ती क्षणभर थांबली आणि पुढे म्हणाली,
@भारतीमहाजन-रायबागकर”त्यानंतरच्या प्रत्येक समारंभात मला वगळण्यात येत असे. सुरुवातीला वाईट वाटायचं…रडुही यायचं…पण मग ठरवलं, आतां रडत नाही बसायचं. त्या उपेक्षेच्या, सहानुभूतीच्या नजराही नाही झेलायच्या. आपण न केलेल्या चुकीची शिक्षा देणार्या ह्या कोण? आपलं अस्तित्वच परावलंबी कां असावं? तेव्हांपासून मी अशा प्रसंगी मुलीला घेऊन बाहेर पडते. रात्री घरी परत जाते.” एका दमात तिनं आपलं म्हणणं सांगुन संपवलं.
“काय योगायोग! मीही आज त्याच विचाराने बाहेर पडले आहे. ती माझी मुलं.” आणि रेवतीने तिला आपली हकिकत सांगितली.
“छान, बरं वाटलं मला, कोणीतरी समविचारी भेटली. कशाला हवंय आपल्याला ह्यांचं सहानुभूतीचं औदार्य! परंपरांचं जोखड बाजूला ठेवून आपण आपल्याला पाहिजे तसे सण-उत्सव साजरे करूया कीं! शेवटी हे नियम, रूढी, परंपरा बनवल्या कुणी? आपणच नं? आणि फक्त सण उत्सवच कां म्हणून?
दैनंदिन जगणं सुद्धा… पुरुषप्रधान संस्कृतीचं रडगाणं गायचं पण वास्तवात स्त्रियाच स्त्रियांचं दुःख जाणुन घेण्याऐवजी तिच्यावर बंधनं घालण्यात कांकणभर पुढेच असतात… नकोच ते…त्यापेक्षा आपल्यासारख्या स्त्रियांचं एक विश्व आपणच निर्माण करूया. कितीतरी स्त्रिया या बदलासाठी उत्सुक असतील, बस्स्…एक आवाज काफी है. ठरलं तर…’नव्या वर्षाचा नवा संकल्प’ आणि त्या दोघींनी एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवले. पुन्हा भेटण्याचे ठरवून दोघीही घरी जाण्यासाठी ऊठल्या. रेवतीने मुलांना हाक मारली.
“आई, खूप मज्जा आली आज” रेवतीच्या मनावरचं मळभ दूर झालं होतं.ओठांवर कवितेच्या ओळी येऊ पहात होत्या…
*सांगा कसं जगायचं*
*कण्हत कण्हत*
*कीं गाणं म्हणत*
*तुम्हीच ठरवायचं*
सोसायटीच्या गेटपाशी रिक्षा थांबली. पार्किंगमध्ये हळदीकुंकू समारंभ आटोपलेला दिसत होता आणि समारंभाची उत्तरचर्चा चालु होती.
“छान झाला नं समारंभ! बरं झालं बाई रेवती आज घरी नव्हती ते.”
“हो नं…जरा ऑकवर्डच होतं मग.”
तेवढ्यात रेवतीलाच येतांना बघुन जरा ओशाळून त्यांनी आपापसांत नेत्रपल्लवी केली. रेवतीने तिकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःहून पुढे येत हसत म्हणाली…
“काय, छान झाला नं हळदीकुंकू समारंभ?”
आणि ऊत्तराची वाट न पहाता ती आपल्या दाराचं कुलूप काढू लागली. त्यांच्या विस्फारलेल्या नजरांकडे लक्ष न देता…’अशा जगास्तव काय कुढावे’ असं मनाशी गुणगुणत.
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334
१३-१-२५
©®ह्या कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.