You are currently viewing राजकवी भा. रा. तांबे १५१ व्या जयंतीनिमित्त “मधु मागसी माझ्या….. एक आदरांजली” कार्यक्रमाचे आयोजन

राजकवी भा. रा. तांबे १५१ व्या जयंतीनिमित्त “मधु मागसी माझ्या….. एक आदरांजली” कार्यक्रमाचे आयोजन

पुणे :

राजकवी भा. रा. तांबे १५१ व्या जयंतीनिमित्त “मधु मागसी माझ्या….. एक आदरांजली” हा कार्यक्रम तांबे कुटुंबीयंतर्फे शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २५, रोज ज्योत्स्ना भोळे सभागृह पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

या समारंभास ज्येष्ठ भावकवी आणि संत साहित्यिक श्री वि. ग. सातपुते हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. प्रसिद्ध कवयीत्री आणि समीक्षक प्रा. नीलिमा गुंडी या प्रमुख वक्त्या होत्या.

या निमित्ताने “सृजनस्नेही” पुणे, निर्मित “स्मरण राजकवींचे” हा भा. रा. तांबे यांच्या निवडक काव्य – गीतांवर आधारित एक सुंदर कार्यक्रम सादर करण्यात आला.

या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि संहिता लेखन सुधीर मोघे यांचं होतं.

सर्वप्रथम या कार्यक्रमाविषयी लिहायचं झालं तर मी सर्वाधिक गुण त्या कार्यक्रमाच्या संहितेला देईन. कारण संकल्पना निश्चितच चांगली आहे पण तिला मूर्त रूप देताना खूप अभ्यास करून आणि राजकवींविषयी, सहसा इतरांना नसलेली माहिती गोळा करून, प्रेक्षकांना कुठेही कंटाळा येऊ न देता, त्यांच्या जीवनातील ठळक घटना/प्रसंग आणि काव्य- गीतांसहित योग्य गुंफण करून, संहिता तयार करणे हे एक अत्यंत क्लिष्ट आणि बुद्धीच्यातुर्याचं काम होतं. पण सुधीरने खूप कष्टाने ती संहिता सरलप्रवाही अशा स्वरूपात सुंदर तयार केली, याबद्दल त्याचे कौतुक निश्चितच करावं लागेल.

“मृत्यूचं आणि मानवी जीवनाचं नातं जेवढं सनातन तेवढंच गहन. आपल्या काव्यप्रतिभेचा दीप आता म्लान होत आहे हे कविवर्यांना जाणवत असताना आपल्या महाप्रस्थानाच्या कवितांमधून मृत्यू आणि अमरत्व यावर त्यांनी कितीतरी प्रकाश पाजळला आहे. विशेषत्वाने “मरणात खरोखर जग जगते” या कवितेत ते लक्षात येतं.”

यासारखी तांबे यांच्या जीवनावर आणि लिखाणावर एकत्रितपणे भाष्य करणारी अशी संहिता, सुधीर मोघे यांनी लिहून तितक्याच ताकदीने सादर केली.

या कार्यक्रमाचा, या आधीही एक प्रयोग पुण्यात झालेला आहे आणि त्याला भरपूर प्रतिसाद देखील मिळाला होता. परंतु या समारंभात तो कार्यक्रम सादर करताना त्यात अनेक छोटे – मोठे बदल करावे लागणार होते आणि ते करून सुद्धा सादरीकरणाचे संतुलन कुठेही बिघडू द्यायचं नव्हतं.

या सादरीकरणात अर्थातच गीत काव्य/कविता यात गायक मंडळींचा मोठा वाटा होता आणि ते सादरीकरण अत्यंत समर्थपणे वृंदा वाटवे – देवधर आणि प्रा. सी. एम. देशपांडे यांनी निश्चितच केले आणि श्रोत्यांची वारंवार दाद मिळवली. यात त्यांना तबल्यावर ज्येष्ठ तबलावादक, श्री सुहास कुलकर्णी आणि पेटीवर श्रीमती वृंदा दातार यांनी अत्यंत उत्तम साथ केली हे देखील नमूद करावे लागेल.

सुधीर मोघे यांचे निवेदन हे अत्यंत उत्स्फूर्त आणि प्रवाही होते यात नवल नाही परंतु ते करत असताना राजकविंविषयी विषयी त्यांना असलेली आत्मीयता, आदर आणि त्यांच्या काव्यगीतांसाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही वारंवार दिसून येत होती.

या कार्यक्रमात सहनिवेदिका म्हणून अनुपमा कुलकर्णी आणि शुभांगी मांडे यांनी सुंदर अभिवाचन तर केलेच परंतु राजकवींच्या काही कवितांचे सुंदर सादरीकरण देखील केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे या अनुभवी निवेदीकेने अत्यंत प्रभावीपणे केले.

संपूर्ण कार्यक्रमात तांबे कुटुंबीयांचा नुसताच आयोजनातील सहभाग नव्हे तर पदोपदी त्यांनी घेतलेले परिश्रम दिसून येत होते.

राजकवी भा. रा. तांबे यांचे हस्तलिखित, त्यांना मिळालेला “राजकवी” पुरस्कार, इतर मानपत्रे यांचे छोटेसे प्रदर्शन, हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा