You are currently viewing विरोधाभास

विरोधाभास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम लेख*

 

*विरोधाभास*

 

सालाबादप्रमाणे नववर्ष येतं आणि पाठोपाठ येते मकरसंक्रांत. साहजिकच पुरुषांना तिळगुळ खायला मिळतात आणि बायकांना मात्र तिळगुळा सोबतच हळदीकुंकवाच्या निमित्ताने नटून सजून मिरवायला आणि एकमेकींना भेटायला मिळतं. मग हलव्याचे दागिने, एखादा खराही दागिना, नवीन त्यातही विशेषतः काळ्या साडीची खरेदी, आणि इतर अनेक वस्तूंप्रमाणे हळदीकुंकवासाठी लागणारं वाण…हे तर सर्वात महत्त्वाचं…यावर चर्चा सुरू होते आणि मग खरेदीही.

 

पण संक्रांत आली की आणखीन एका मुद्द्यावर चर्चासत्रं सुरू होतं. हळदी कुंकू समारंभात विधवांना बोलवायचं की नाही? खरं म्हणजे हा मुद्दा आता बऱ्याच दिवसांपासून चर्चिला जातो.

अगदी चावून चोथा झाला आहे त्याचा.

 

बऱ्याच ठिकाणी असा भेदभाव न करता सर्वच स्त्रियांना बोलावल्या जातं.

कुठे कुठे त्यात त्यांच्यावर उपकार केल्याचा भाव असतो तर कुठे मात्र अगदी सहजपणे, निर्मळ मनाने, सहजपणाने त्यांना बोलावून त्यांचा सन्मान केल्या जातो.

 

मुली लहानपणापासूनच कुंकू लावत असतात. मग विधवा झाल्यावर का नाही लावायचं…हा एक त्यातील महत्त्वाचा मुद्दा.

 

आता तर सर्वचजणी पतीनिधनानंतर घरी आणि घराबाहेरही बारीकशी डार्क रंगाची का होईना पण टिकली

लावतातच. आणि त्यात कोणाला वावगंही वाटत नाही.

 

पण विवाह, बारसं, मुंज आणि विशेषतः हळदीकुंकू समारंभात, मात्र त्यांना हळदीकुंकू लावणं आणि लावून घेणं वर्ज्य असतं. अपवाद सोडुन देऊ.

 

आणखी एक परंपरा म्हणजे फक्त आणि फक्त स्त्रियांच्याच नावामागे कुमारी म्हणजे अविवाहित, सौभाग्यवती म्हणजे विवाहित आणि श्रीमती म्हणजे विधवा अशी त्यांची सद्यस्थिती दर्शविणारी म्हणजेच पुरुषांशी निगडीत असलेली विशेषणं लावली जातात. तसेच नावाप्रमाणेच लहानपणापासून कुठल्याही स्वरूपात लावत असलेल्या कुंकवाला तसेच काचेच्या बांगड्यांना लग्नानंतर मात्र पतीच्या नात्याशी जोडल गेलं आहे. आणि त्यासोबत लग्नानंतर घातल्या गेलेल्या मंगळसूत्रालाही. त्यामुळे पती निधनानंतर पत्नीचा विचार न घेता, आणि तिच्या भावनांचा आदर न करता तिचं कुंकू पुसणं, बांगड्या फोडणं आणि मंगळसूत्र काढून घेणं असे प्रकार केल्या जातात. तसेच यापुढे तिने नवीन भरजरी साड्या न नेसता साध्या, मोजक्याच रंगाच्या साड्या नेसाव्यात म्हणून कदाचित तिला त्यावेळेस नवीन साडीही नेसवत असावेत.

 

खरं म्हणजे बहुतांश स्त्रियांनी या रूढी आता कालबाह्य ठरवल्या आहेत. त्या प्रसंगापुरतं जरी कोणी हे सर्व प्रकार करून घेतले किंवा न घेतले तरीही नंतर त्या नवीन साड्या नेसतात. मॅचिंग बांगड्या घालतात, टिकली लावतात आणि स्वतःच्या भावना जपायच्या म्हणून किंवा सुरक्षितता म्हणूनही मंगळसूत्रदेखील घालतात. हा एक चांगला पायंडा पडला आहे.

 

आता ह्याच नाण्याची दुसरी बाजू देखील बघितली तर काय दिसतं.

मुलीचं लग्न ठरल्यावर शालू, घागरा, दागिने, कपडे इत्यादींची मनपसंत खरेदी होते. नंतर होऊ दे खर्च म्हणत त्यांना अनुषंगून आणखीन विविध मॅचिंगच्या वस्तू घेतल्या जातात. मंगळसूत्रासाठी तर कितीतरी डिझाईन्स बघितले जातात. आता तर एक सासरचं, एक माहेरचं, एक समारंभात घालण्यासारखं वजनदार, एक ऑफिसला घालण्यासारखं दिसेल न दिसेल असं हलकसं, नाजूक आणि एखादं अजून आवडलं म्हणून अशा विविध मंगळसूत्रांची खरेदी होते. लग्नानंतर मात्र ड्रेसच घालायचे असतात म्हणून शालू, साड्यांना कपाटात नजरकैदेची शिक्षा होते, आणि दागिन्यांना तर लाॅकरमध्ये जन्मठेपेचीच. आणि ही शिक्षा इतकी कठोर असते की एखादं आर्टिफिशियल किंवा सोन्याचं मंगळसूत्रसुद्धा गळ्यात घालायची मुलींची तयारी नसते.

 

कदाचित आपल्या आचार-विचार स्वातंत्र्याचा, स्त्री समानतेचा पुरस्कार करत असतील, त्यांना बंधनं/बेड्या मानत असतील किंवा आणखीन एखाद्या कारणामुळे बरेचदा परिचित-अपरिचित विवाहित, सवाष्ण तरुणी टिकली, बांगड्या, मंगळसूत्र विरहित अशा आपल्यासमोर येतात…

 

आणि त्याचवेळी विधवांविषयी मात्र

हळदीकुंकू, मंगळसूत्र इत्यादींची चर्चा सुरू असते.

 

काय म्हणावं या विरोधाभासाला!

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

©® या लेखाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा