You are currently viewing सावंतवाडीत ठेकेदाराकडून ‘धुळफेकीचा ‘ प्रकार – शब्बीर मणियार

सावंतवाडीत ठेकेदाराकडून ‘धुळफेकीचा ‘ प्रकार – शब्बीर मणियार

सावंतवाडीत ठेकेदाराकडून ‘धुळफेकीचा ‘ प्रकार – शब्बीर मणियार…

सावंतवाडी

ठेकेदाराने सावंतवाडी शहरासह बाजारपेठेत खड्डेमय रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले आहे. मात्र, हे काम पुन्हा करताना ठेकेदाराकडून ‘धुळफेक’ करण्याचा प्रकार घडत आहे. डांबर कमी अन् ग्रीड जास्त वापरल्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गाला धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पहाटे फिरताना नागरिकांच्या घशामध्ये या धुळीचे कण जात आहेत. यामुळे संतप्त झालेल्या राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारी वर्गाने आज शुक्रवारी सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत त्यांना चांगलेच धारेवर धरले.

गेल्या ४० वर्षांत सावंतवाडीत जे घडले नाही ते आज घडत आहे. निकृष्ट दर्जाचे काम करून बीलाचे पैसे मिळवण्यासाठी पुन्हा तसाच प्रकार केला आहे. ठेकेदार आणि पालिका प्रशासनाचे जबाबदार लोक जनतेच्या पैशाचा अपव्यय करत आहेत. काम सुरू असताना पालिकेचे सुपरवायझर त्याठिकाणी हजर नसतात. केवळ मलिदा खाण्याचे काम ठेकेदाराकडून होत असून याला पालिकेच्या अधिकाऱ्यांची साथ असल्याचा गंभीर आरोप यावेळी उपस्थितांनी केला. तसेच शालेय विद्यार्थी, व्यापारी, नागरिकांना धुळीचा होणारा त्रास याबाबत खडेबोल सुनावत उपस्थितांनी मुख्याधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.

दरम्यान, स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष मतदारसंघात नाही. प्रशासनावर कुणाचा अंकुश राहीलेला नाही. त्यामुळेच हा अंदाधुंद कारभार सुरू असल्याचा आरोप उबाठा शिवसेना उप जिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी केला. तसेच धुळीच्या साम्राज्यातून व्यापारी वर्गाची मुक्तता न केल्यास संपूर्ण बाजारपेठे बंद ठेवून व्यापाऱ्यांसह नगरपरिषदेच्यासमोर बसणार असा इशारा दिला. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी उपस्थितांच्या भावना ऐकून घेत आज रात्री बाजारपेठ बंद झाल्यावर रस्त्यावरील ग्रीड बाजूला काढू, धुळीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन दिले.

यावेळी उबाठा शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, राष्ट्रवादी श.प.चे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उबाठा शिवसेना शहराध्यक्ष शैलैश गवंडळकर, निशांत तोरसकर, मनसे तालुकाध्यक्ष ॲड. राजू कासकर, व्यापारी संतोष मुंज, सुधीर पराडकर, संजय नार्वेकर, जगन्नाथ केनवडेकर, प्रसाद वागळे, किशोर वागळे, राजा वाडकर व बाजारपेठील व्यापारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा