*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*काय आहे कविता….*
समजत नाही किती ते म्हणती सहजी कविता
वाहून नेते मलिन सारे नदी आहे हो कविता..
कमी बोलते किती सांगते थोडक्यात ती कविता
उफाळणारा कड्यावरूनी झराच आहे कविता..
“ज्वाला आणि फुले आहे”ती मुरलीधराची कविता
“अग्निपंख” कलाम आहे मुलायम ती कविता..
“गर्जा जयजयकार”म्हणत ती क्रांति पेटवी कविता
“इन्किलाब जिंदाबाद “ भगतसिंग ती कविता..
“सागरास ती साद घालते”तळमळते ती कविता.
मातृभूमीला ने ना मजला कळवळते ती कविता..
“पृथ्वीचे ते प्रेमगीत” हो दुर्बल नाही कविता
अग्नीगोल ती धगधगणारा, सविता आहे कविता..
“चौथऱ्यावर अश्रू ढाळते”जाती वाटल्या म्हणता
पाठीशी मम फक्त भिंती हळहळते ती कविता..
“ताठ कणा” ती ठेव सांगते देते उभारी कविता
“जयोस्तुते ती महन्मंगला”काट्याने उतरे कविता.
महान आहे मंगल आहे चंद्रसूर्य ती कविता
जीवनाचे अर्कच आहे कविता..पूजनीय देवता…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)