*भाजप पदाधिकाऱ्यांनी मालवण बसस्थानकात ठेवलेल्या मोबाईल टॉयलेटचे सांडपाणी उघड्यावरच सोडल्याने दुर्गंधी*
*वैभव नाईक यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी घिसाडघाईने नळपाणी योजनेचे उद्घाटन*
*रत्नागिरीतील शिंदेसेनेच्या नेत्यांचे एलईडी आणि पर्ससीननेट मच्छीमारीला अभय*
*शिवसेना जिल्हा प्रवक्ते,माजी नगरसेवक मंदार केणी यांची भाजपसह शिंदेसेनेवर टीका*
माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम सुरू असून प्रवाशांना टॉयलेटची सोय व्हावी यासाठी ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था करून दिली होती. मात्र ही व्यवस्था चांगली नाही आणि प्रवाशांचे हाल होत आहेत अशी भूमिका घेऊन काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण नगरपरिषदेचा मोबाईल टॉयलेट मालवण बसस्थानकात नेऊन ठेवला त्याचे फोटो सेशन करून प्रसार माध्यमांमध्ये त्याची बातमी करण्यात आली. मात्र आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता आता त्या मोबाईल टॉयलेटला पाण्याचे कनेक्शन देखील देण्यात आलेले नाही,पाण्याचे कनेक्शन नसल्याने त्याठिकाणी प्रवाशांचे अधिक हाल होत आहेत. त्याचप्रमाणे टॉयलेटचे सांडपाणी सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही. पाईप लावून ते सांडपाणी टाकीत सोडण्याबाबत नगरपरिषेदेने भाजप पदाधिकाऱ्यांना बजावले होते. मात्र ते सांडपाणी उघड्यावर सोडण्यात आलेले आहे ते वाहत वाहत एसटी डेपोच्या बाहेर येत आहे. त्याचा दुर्गंध सर्वत्र पसरत आहे. लोकांना सेवा मिळावी यासाठी जी गोष्ट आपण करतो त्या गोष्टीवर शेवटपर्यंत लक्ष ठेवणे ही आपली जबाबदारी आहे मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तेव्हा फोटोसेशनपूर्ती मोबाईल टॉयलेटची सेवा दिली नंतर त्याकडे दुर्लक्ष केला.याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो. अशी टीका शिवसेना जिल्हा प्रवक्ते, तथा माजी नगरसेवक मंदार केणी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शिवसेना मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, साई वाघ उपस्थित होते.
मंदार केणी पुढे म्हणाले, मालवण मधील जुनी नळपाणी योजना अतिशय जीर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक दिवस नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागते. मालवणमध्ये वाढत असलेले पर्यटन, वाढती लोकसंख्या आणि भविष्यात मालवण शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन माजी आमदार वैभव नाईक यांनी ४३ कोटींची नळपाणी योजना मंजूर करून घेतली. मालवणच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. तारकर्ली देवबाग या गावांना देखील पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीने नियोजन बद्ध आराखडा वैभव नाईक यांनी तयार करून घेतला. नवीन नळ पाणी योजनेमुळे विजेची तसेच पाण्याची बचत होणार आहे.त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यावरही पाणी पुरवठा केला जाणार आहे. मात्र वैभव नाईक यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी घिसाडघाईने नळ पाणी योजनेचे निलेश राणेंनी उद्घाटन केले.
निलेश राणेंनी मालवण नगरपरिषदेत कचऱ्याचा आढावा घेतला मात्र भाजपचे पदाधिकारी त्यांना कचऱ्याच्या समस्या सांगण्यात कमी पडले. घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, घंटागाडी प्रत्येक भागात पाठवणे असे हे टेंडर आहे मात्र संबंधित ठेकेदार या ठिकाणी येतच नाही सफाई कामगारांचे पीएफ भरण्यात आले नाहीत. त्या ठेकेदाराकडे केवळ १५ कर्मचारी उपलब्ध आहेत त्यातील १० कर्मचारी कार्यरत आहेत. सत्ताधाऱ्यांचे प्रशासन आणि ठेकेदारावर कोणतेही वचक नाही त्यामुळेच मालवण शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
सी.आर.झेड. चा नकाशा बनवण्यासाठी नेमलेली केरळची संस्था फी आकारते ती जाचक आहे. त्यामुळे सीआरझेडच्या अनेक परवानग्या रखडल्या आहेत. पूर्वी ज्याप्रमाणे
सी. आर. झेड नकाशे घेतले जायचे त्याचप्रमाणे आताही घेतले जावेत. अशी आमची भूमिका आहे. मात्र निलेश राणेंना याबाबत माहिती देण्यात त्यांचे पदाधिकारी आणि नगरपरिषद अपयशी ठरली. विद्यमान आमदारांनी स्पॉट पंचनामे केले तरी जोपर्यंत सिस्टीम बदलत नाही तोपर्यंत कार्यवाही होणार नाही. स्पॉट पंचनामा एकदिवसाच्या फोटोसेशन पुरता ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जैसे थे परिस्थिती असते. शहरात तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, स्ट्रीट लाईट, हायमास्ट सुरू ठेवणे हे नगरपरिषदेचे दैनंदिन काम आहे ते त्यांनी केलेच पाहिजे. आणि त्यासाठी जर निलेश राणे यांना सारखा आढावा घ्यावा लागणार असेल तर सत्ताधारी प्रशासनावर वचक ठेवण्यात अपयशी ठरले आहेत हे सिद्ध होते.
निलेश राणेंच्या पक्षातीलच रत्नागिरीतील शिंदेसेनेच्या नेत्यांचे एलईडी आणि पर्ससीननेट मच्छीमारीला अभय आहे. रत्नागिरीतील जयगड बंदरात एलईडी पर्ससीननेट बोटी थांबतात त्याला निलेश राणे विरोध करतील का? एक दोन अवैध बोटींवर कारवाई केली म्हणजे पारंपरिक मच्छिमारांचा प्रश्न सुटला असे नाही.त्यासाठी कायमस्वरूपी उपायोजना होणे गरजेचे आहे. ४०० एकर जमिनीत सी वर्ल्ड प्रकल्प होऊ शकत होता त्यासाठी बाराशे एकर जमीन संपादित करण्याचा घाट घालण्यात आला त्यामुळे वायंगणी कालावल ही गावे या प्रकल्पात बाधित होणार होती. अतिरिक्त संपादित करण्यात येणारी जागा दिल्लीच्या लोकांनी खरेदी केली होती. त्यामुळे स्थानिकांनी या प्रकल्प विरोध केला. शिवसनेचा विरोध सी वर्ल्ड प्रकल्पाला नव्हता तर अतिरिक्त जागा संपादनाला विरोध होता.असे मंदार केणी यांनी स्पष्ट केले.