बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापुरातील दोघे ताब्यात….
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; १० लाखाचा मुद्देमाल जप्त….
बांदा
बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. यात २ लाख २४ हजाराच्या दारूसह ८ लाखाची गाडी असा एकूण १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रेम शामलाल पंचवानी ( वय २८) व राहुल अशोक पाटील (वय ३४, दोघे रा. कोल्हापूर ) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई समर्थ हाॅटेल जवळ, सटमटवाडी- बांदा येथे करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कला मिळालेल्या गोपीनीय माहितीनुसार शेर्लेहून खामदेव नाक्याकडे येणाऱ्या संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा दिला असता ते वाहन न थांबल्याने पोलिसांनी खाजगी वाहनाने त्यांचा पाठलाग केला असता त्या वाहनात गोवा बनावटी विदेशी मद्याच्या एकूण ३१ पेट्या आढळून आल्या. ही कार्यवाही राज्य उत्पादक शुल्क अध्यक्ष मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, रणजीत शिंदे, सतिश चौगुले, सागर सुर्यवंशी, अभिषेक खत्री यांनी केली.