कणकवली पर्यटन महोत्सवाचा शोभयात्रेने शानदार प्रारंभ…
कणकवली
पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ आज शहरातून काढण्यात आलेल्या शानदार शोभायात्रेने झाला. श्री पटकीदेवी मंदिराकडून बाजारपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौकातून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पर्यटन महोत्सवाच्या स्थळापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शहराच्या विविध प्रभागांतून आलेले चित्ररथ, भव्य गणेश मूर्ती प्रतिमा तसेच प्राथमिक शाळांनी सादर केलेले देखावे लक्षवेधी ठरले.
शोभायात्रेमध्ये सिंधुगर्जना ढोलपथकाच्या ढोलवादनाने जोरदार वातावरण निर्मिती झाली. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी पाच वाजता पटकीदेवी मंदिराकडून शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, विराज भोसले, किशोर राणे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, शिशिर परुळेकर, अण्णा कोदे, रवींद्र गायकवाड, संदीप नलावडे, प्रा.हरीभाऊ भिसे, अजय गांगण, राजू गवाणकर, रंगकर्मी सुहास वरुणकर, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान रात्री नऊ वाजता राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, कुडाळचे आमदार निलेश राणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर इंडियन आयडॉल फेम सलमान अली आणि वाद्यवृंद यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा होणार आहे.