You are currently viewing बाळशास्त्री पुन्हा कधी जन्माला येतील “??? अॅड. नकुल पार्सेकर

बाळशास्त्री पुन्हा कधी जन्माला येतील “??? अॅड. नकुल पार्सेकर

“बाळशास्त्री पुन्हा कधी जन्माला येतील “??? अॅड. नकुल पार्सेकर

मागच्याच आठवड्यात नाशिकला सकाळी फेरफटका मारताना मला एका रिक्क्षावाल्याच्या रिक्क्षेवर माझ्या मनातल्या विचारानां पुष्टी देणारा एक फलक दिसला. त्यामध्ये आमच्या जाणत्या राजाचा अर्थात छञपती शिवाजी महाराजांचा आकर्षक फोटो आणि त्या फोटोखाली ठळक ओळीत लिहिले होते ” राजे, तुम्ही पुन्हा एकदा या भूतलावर जन्म घ्या “…
आज कोकणरत्न दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. सगळीकडे आमच्या अनेक पञकार मिञांच्या वतीने, पञकार संघाच्या वतीने हा दिवस पञकार दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या सिंधुदुर्गातही आज पोबुर्लैच्या सुपूञाचा जन्मदिवस ओरस येथे अखिल भारतीय पञकार संघाच्या प्रयत्नामधून बांधलेल्या बाळशास्त्री जांभेकर पञकार भवनमध्ये महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मस्य व बंदर विकास मंत्री मा. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. जेष्ठ पञकार श्री गजानन नाईक आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी हे दर्पणकारांच्या नावाने सर्व सोयीने युक्त असं पञकार भवन उभारलेल आहे. यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडचं आहे .
पञकार व आजची पञकारिता हा अतिशय गांभिर्याने विचार करण्याचा विषय आहे. समाजप्रबोधना बरोबरचं अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, गुन्हेगारी अशा विषयावर सडेतोड लेखन करून वास्तव समाजा समोर आणणे हीच खऱ्या पञकारां कडून आमच्या सारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्त्याची अपेक्षा असते. पञकाराने समाजाचा आरसा बनून काम केल पाहिजे… पण आजच्या पञकारीतेत हा लोकशाहीचा चौथा खांब डळमळताना दिसतोय. काही अपवाद सोडल्यास अनेक वाहिन्या व प्रिंट मिडिया प्रवाहासोबतच राहून ” सुखासीन ” पञकारीतेलाच प्राधान्य देत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढ्यात वर्तमान पञानी फार मोठी भूमिका बजावली होती. केसरी सारख्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर लोकमान्य टिळकांच्या नावाने ठळकपणे छापून यायच “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का “? तेव्हा स्वातंत्र्याच्या लढ्याला एक उर्जा मिळायची. आजची परिस्थिती खूपच निराळी आहे. सरकार कोणत्याही विचारांचे असो… चांगल्या धोरणाचं कौतुक केलचं पाहिजे. चांगले निर्णय समाजाभिमुख करण्यासाठी आपली लेखणी वापरलीच पाहिजे पण जेव्हा सामाजिक जडणघडणीला मारक निर्णय घेतले गेले तर वृत्तपत्रानी, वाहिन्यानी आपल्या लेखणीचा, विचारांचा निर्भीडपणे वापर केला पाहिजे. होय, ही गोष्ट पण तेवढीच सत्य आहे की, पञकार आज प्रचंड दडपणाखाली आहेत. त्यांच्या निर्भीडतेला निश्चितच मर्यादा आलेल्या आहेत. अन्याय, अत्याचाराच्या बातम्या छापणाऱ्या किंवा प्रसारित करणाऱ्या काही धाडसी पञकारांवर जीवघणे हल्ले होत आहेत. हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. मागच्याच आठवड्यात एका पञकाराचा भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून खुन झाल्याची बातमी आपण ऐकली. तरीही पञकारानी कोणत्याही क्षणिक आमिषाला बळी न पडता सुद्रूढ आणि निकोप समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहिल पाहिजे.
आजची राजकीय व सामाजिक परिस्थिती पहाता आजच्या पञकारानां हा लोकशाहीचा चौथा खांब मजबूत करण्याचे फार मोठे आव्हान आहे. भले आपण दर्पणकार होणार नसाल पण बाळशास्त्रीना अभिप्रेत असणारी निर्भीड पञकारिता जास्त नाही पण कणभर तरी करता आली तरच खऱ्या अर्थाने बाळशास्त्रीचं स्मरण केल्याचं आत्मिक समाधान लाभेलं.पञकार दिनाच्या सर्व पञकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
दर्पणकार बाळशास्त्रीना विनम्र अभिवादन!

प्रतिक्रिया व्यक्त करा