*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*हरवलीच ती*
निर्मला आमच्याच वर्गातली खाऊच्या शाळेपासुन अकरावी पर्यंतची एक “समंजस” अशी हुषार वर्ग मैत्रीण !
अकरावीचा निकाल लागला चांगलेच मार्क्स मिळवले तिने वडील पदवीधर व चांगल्या हुद्द्यावर होते. घरात साधारण सुबत्ता होती.
पण तिची रहाणी मात्र फारच वेगळी होती.
मी ही तिची कथा साठ वर्षापुर्वीची लिहिते आहे. त्याकाळात मुली मोठ्या होतायत तोच साडी नेसायला लावायचे. पंधरा सोळा वर्षाच्या मुली साडी अक्षरश:गुंडाळत. तेल रोज रोज चोपडून करकचुन बांधलेल्या वेण्या. पावडर बाटलीतलं ओलं कूंकू.!बस!इतकीच काय ती शाळेची तयारी.हातात दौत, सुती दप्तर व कडीचा पोळी भाजीचाच डबा. आताच्या मानाने अगदीच गबाळं,बावळट असे आम्ही होतो.
गावातच राहिल्याने वेंधळेपण असेच.
बाहेरच्या जगाची खेळांची फारशी ओळख नसल्याने फारसं बोलताही येत नसे. मुलांना सर्व प्रकारच्या मुभा तर मुलींना अनेक बंधने.
पोषाख, केसांची पद्धत, सगळंच जून्याच पद्धतीचं अशा आम्ही अकरावी झालो. हॉटेल, प्रवास, खरेदी अशी काही आकर्षणं नसताना कॉलेजात दाखल झालो.
इथे आल्यावर मात्र सुसाट सुटलो. रहाणी, विचारसरणी, सगळंच बदलून गेलं.
बाहेरचं जग तेही शहरी …. अनेक आकर्षक वस्तू बाहेरचे खाणे. इ. त्याकाळातही मजा वाटणारी जिवनसरणी मिळाली. रेल्वेनी ये जा ,पास काढणे, इ. सुरू झाले. . या सगळ्यामुळे आमच्यात जरा बदल झाला.देहबोली बदलली.
आम्हाला घरून तितकी मोकळीही मिळाली.
त्या काळी नितिमत्ता टिकून होती. अंगावर दोन चार सोन्याच्या वस्तू घालुन बायका, मुली ये जा सहजपणे करत.आज जे रोजच पेपरला वाचुन कोडगेपण आलंय ते गुन्हे अपवाद म्हणुन वर्षा दोन वर्षात घडत.
चोरून घडलेलं नको ते ऐकत असू पण इतकं भयानक वास्तवात नव्हतंच.
निर्मलाच्या घरी तिचं सगळं प्रेमाने करणारी आजी होती. संसारात ऊत्तम गृहिणी, सुगरण म्हणुन नावाजली होती पण जुनाट अशा पोक्त विचारांची होती.
आमच्या वागण्यावर तिची कावळ्यासारखी एकाक्ष नजर असे.
तिने निर्मलाला खुप धाकात ठेवली होती.पोषाख, बोलणं चालणं इतकंच काय पण हंसण्यावर ही बंधने होती. केस कापायचे नाहीत. बाहेर खायचे नाही. मुलांशी बोलायचे नाही फिरायचे नाही. ह्या बंधनांमुळे निर्मला अधिकच बावळट, वेंधळी गबाळी होत गेली. रूप असुनही …फारसं कोणी तिच्याशी बोलतही नसे मग मौज मजा मस्ती तिला कॉलेजात असुनही करता येत नव्हती. एक बावळट शाळू सोबती म्हणुनच राहिली.
सहामाही होतेय तोच तिच्या आजीने तिचे लग्न ठरवले पण.
घरात आजीपुढे कोणाचे चालत नसे.
एक गर्भ श्रीमंत ,प्रतिष्ठित, स्थळ आलं… निर्मला पसंत पडली… लग्न सोहळा होऊन ती दहा माणसांच्या एकत्र कुटूंबात तेही कोकणात अगदी अंगभर दागिन्यानी मढलेली अशी सासरी गेली. इथे संपलंच सगळं.
आम्ही त्याही काळात पदवी घेतली…. नोकरीला लागलो.. रहाणी, देहबोली, वागणं, सगळंच पूर्ण बदललेल्या आम्ही स्वतंत्र विचाराच्या, स्वावलंबी, बंधने असुनही मनपसंत वागणार्या, हवी तेवढी खरेदी करणार्या अशा .. तरतरीत, आकर्षक झालो. शाळेचा गावठीपणा कूठच्या कूठे हाकलून लावला.
नोकरी दोन तीन वर्ष करत आमच्या मनासारखा, शिकलेला, शहरातला, स्वतंत्र रहाणारा चांगली नोकरीवाल्या मुलाबरोबर लग्ने झाली.
आमचं आणि निर्मलाचं केवळ सहा वर्ष लग्न आधी झाल्याने .. या काळात आम्ही जे कमावलं ते निर्मलाने तिची चूक नसताना गमावलं होतं.
तिला आत्ताच दोन मुली होत्या व मुलगा नसल्याने अपमान हेटाळणी, कमीपणा आला व ती अधिकच वेंधळी बावळट झाली. एका हुषार मुलीचं एका प्रेमळ आजीमुळे प्रचंड नुकसान केलं गेलं होतं.
ती भेटल्यावर चोरटे पणाने , एका न्युनगंडाने पछाडलेली अशी केविलवाणी दिसायची, बोलायची.
श्रीमंत माहेर व सासरही असुन तिला काहीच मिळालं नाही.
आमच्या नोकर्या, प्रमोशन्स, पगार हिंडणं फिरणं खरेदी रहाणी देसबोली पोषाख याकडे ती हेवा वाटतो अशा नजरेनी बघायची व लवकरच पाय काढता घ्यायची. अंगभर दागिने बहुदा तिला टोचत असावेत.
आमच्या बालसंगोपनात दहाबारा वर्षात तेव्हा फोन मोबाईल नसल्याने फारशा गाठीभेटी झाल्या नाहीत आणि आम्हीही फारशा ऊत्सुक नव्हतो तिचे पोक्तपण चघळायला.
पण मधे एका मैत्रीणीचा फोन आला. तिने निर्मलाची मुलगी आय. ए. एस. ला नंबरात आली व दुसरी पोलिस खात्यात एका पदकाने गौरवली गेली.
आम्हाला ऐकून खुपच आनंद झाला. तिला फोनवर अभिनंदन केले. तिने तिला जे मिळाले नाही ते तिने धिटाई पैसा व आपली हुषारी वापरून… दोघींना आजच्या काळात संघर्ष करत जगतील अशा प्रकारची सारी सोय सुविधा व मोकळीक दिली होती. त्यामुळे मुली मोकळ्या हंसत्या खेळत्या, धिटपणे बोलणार्या , खेळात पुढे, छंदवर्गात पुढे, हवे तसे के स ठेवणे. पोषाख घालणे हिंडणे फिरणे सगळ्यात स्मार्ट झाल्या. ऊत्तम पोहणे , व्यायाम, खेळ यात नावाजल्या… पुढे एकीकडे मनसोक्त आवडीने शिकल्या.. स्कूटर मोटार चालवायला लागल्या. आवडीच्या क्षेत्रात मेहनत व हुषारीवर नोकरीत स्थिरावल्या.
आई निर्मलाने त्यांना मोलाचे पाठबळ दिले होते.
ज्या वयात जे हवं ते तिने मुलींना आवर्जून दिले.
मधे तिची आजी वारली . प्रेमळ असुनही तिच्या सनातनी तत्वे निर्मलावर लादल्याने तिचे अत्यंत नुकसान केले होते.
त्यामुळे आजीच्या चुकलेल्या एका निर्णयामुळे ती खुप खुप मागे पडली. तिचे व्यक्तीमत्व च तिने गमावले होते.
आजी प्रिय असुनही तिला ती गेली तेव्हा फार रागही आलेला होता.
ते नुकसान तिने मुलींना विशेष वागवून भरून काढले होते.
लग्न काय होतील… नंतर मूलेही होतील पण रूबाबात स्वाभिमानाने जगायचे असेल तर मुलींनी भरघोस शिक्षण व अर्थाजन हे आधी केले पाहिजे. लग्न नंतर.
परवा एका नाटकाला निर्मला व दोन्ही लेकी अशा रूबाबात दिमाखात स्वत: गाडी चालवत आल्या कि, मी हीच का ती निर्मला?
म्हणुन बघत बसले. भानावर आल्यावर तिचे पुन्हा अभिनंदन केले. मुलींचे कौतुक केले.व आमची हरवलेली मैत्रीण परत मिळाल्याचे समाधान पण मिळवले.
इतर मैत्रीणींना हे कळवले. सर्वांनी खुश होऊन तिला तिच्या मुलींसह या रवीवारी भेटण्यासाठी जेवायला बोलावले आहे.
अनुराधा जोशी.
अंधेरी मुं. 69
9820023605