*आरोस दांडेली येथे सायंकाळी बिबट्या थेट अंगणात*
विशेष संपादकीय….
वन्यप्राणी मानवी वस्तीत….याला जबाबदार कोण..? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. नुकताच सावंतवाडी शहरात माठेवाडा परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याने अंगणातून पाळीव कुत्र्याला उचलून नेल्याची घटना ताजी असतानाच जुना बाजार परिसरातून कुत्रे गायब होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. नरेंद्र डोंगरावर रात्रीच्या अंधारात बिबट्याचा वावर असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पहाटे, सायंकाळी नरेंद्र डोंगर परिसरात फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सावंतवाडी शहरातील घटना ताजी असतानाच मुडूरा परिसरात बिबट्या विहिरीत पडून मेल्याची खबर आली आणि आता तर तेथूनच पाच सहा किमी परिसरातील आरोस दांडेली येथील एका घराच्या अंगणात सायंकाळी ७.३० वाजताच बिबट्या कुत्र्यांच्या मागे पळत असल्याचे घरातील सीसी टिव्ही मध्ये कैद झाले आहे. त्यामुळे सायंकाळी स्वतःच्या घरात देखील मानव सुरक्षित नाही का..? मानवी वस्तीत देखील माणसांनी सायंकाळी घराबाहेर पडू नये का..? मुलांनी अंगणात खेळू नये का..? असे भय निर्माण करणारे प्रश्न बिबट्याच्या वावरामुळे लोकांच्या मनात उपस्थित होत आहेत.
सावंतवाडी शहरात आतापर्यंत बाजारपेठेतून हत्ती फिरून गेले होते, गवे तर कळपाने भर रस्त्यात फिरत आहेत. पण, आता बिबट्या घराच्या अंगणात फिरू लागल्याने जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे का फिरू लागले आहेत..? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले असता जंगली प्राण्यांना जंगलात शिकार मिळत नाही का..? आपले पोट भरण्यासाठी शिकारीच्या शोधत बिबटे शहराकडे वळले आहेत का..? असे एक ना अनेक प्रश्न सतावत आहेत. सावंतवाडी शहरातील मर्यादित जागा संपल्याने मानवाने आपला मोर्चा जंगल पायथ्याकडे वळविला त्यामुळे होणारी जंगलतोड वन्य प्राण्यांच्या दृष्टीने असुरक्षिततेची भावना निर्माण करते. त्यामुळे जंगलात होणारे अतिक्रमण ही सुद्धा वन्य प्राणी मानवी वस्तीत येण्याचे कारण बनले आहे.
दुसरा एक गंभीर प्रश्न म्हणजे जंगली प्राण्यांची मानवाकडून होणारी शिकार. छोटे प्राणी लहान कीटक, मुंग्या खातात. मोठे प्राणी छोट्या प्राण्यांना आणि हिस्त्र प्राणी मोठ्या प्राण्यांना खातात ही साखळी सुरूच असते. अशावेळी मांस खाण्याच्या उद्देशाने जंगली प्राण्यांची मानवाकडून होणारी शिकार आणि त्यामुळे वाघासारखा हिंस्त्र प्राण्यांना पोट भरण्यासाठी सहज न मिळणारी शिकार यामुळे जंगली प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या मानवी वस्त्यांकडे अन्नाच्या शोधात फिरू लागले आहेत. हे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मानवी वस्तीत असणारे भटके कुत्रे हे बिबट्यांसाठी मिळणारे सहज सावज असल्याने त्यांनी आपला मोर्चा शहराकडे वळविला असल्याचे देखील मान्य करावे लागेल.
आरोस दांडेली परिसर हा जंगलमय, काजूच्या बागांनी बहरलेला आणि डोंगराच्या पायथ्याशी बारमाही वाहणारी नदी. यामुळे तिथे वन्य प्राण्यांना अन्न आणि पाणी दोन्ही मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे अनेकदा रस्ता ओलांडून बिबट्या सारखे प्राणी पाण्याच्या दिशेने जाताना दिसत होते. परंतु, गेल्या काही वर्षात साटेली मायनिंगमुळे जंगलावरच मानवाने अतिक्रमण केल्याने आता वन्य प्राण्यांनी मानवी वस्तीकडे अतिक्रमण करण्यास प्रारंभ केला म्हटल्यास वावगे ठरू नये. अवैध वृक्षतोड हा गंभीर प्रश्न आहेच…पण,साटेली, तळवणे परिसरात मोठ्या प्रमाणावर मायनिंग काढण्याचे काम सुरू असून संपूर्ण साटेली तलवणे परिसरातील डोंगर केवळ बोडका केला नाही तर मायनिंग खोदून नाहिसाच केल्याने जंगली प्राण्यांनी आपला आसरा शोधायचा कुठे..? असा प्रश्न निर्माण झाल्याने बिबटे मानवी वस्तीत घुसले असे निदर्शनास येते. आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे मायनींग करिता खोदाई करताना जंगलाची जंगले उद्ध्वस्त झालीत त्यामुळे अनेक छोटे मोठे प्राणी देखील स्थलांतरित झालेत. त्यामुळे हिंस्त्र प्राण्यांना अन्न मिळेनासे झाले आहे. परिणामी वन्य प्राणी आज अंगणात आलेत उद्या घरात येतील याबद्दल शंकाच नाही.
*सिंधुदुर्ग वनविभाग संशोधनाचा विषय*
मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड, मायनिंग खोदताना होणारी खोलवर माती खोदाई, अतोनात वृक्षतोड, आणि भविष्यात केली न जाणारी झाडांची लागवड यामुळे जंगलांची संख्या कमी होते आहे. प्राण्यांची तस्करीच्या दृष्टीने म्हणा अथवा मांस खाण्यासाठी शिकार केली जाते. परंतु वन विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन सुशेगाद असल्याने जंगली प्राणी असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे हळूहळू त्यांचा वावर मानवी वस्त्यांमध्ये वाढू लागला आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे ही वन विभागाची जबाबदारी आहे परंतु जंगली प्राणी वस्तीत आले तरी आरामात असलेला वन विभाग पाहिला असता सिंधुदुर्ग वन विभाग संशोधनाचा विषय होऊ लागला आहे.