उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांची प्रतिक्रिया
बांदा :
पक्षाच्या धोरणानुसार उपसरपंच पदावरून जरी पायउतार झालो असलो तरी बांदा शहराच्या विकासासाठी कायमच कार्यरत राहणार आहे. वर्षभराच्या कारकिर्दीत बांदावासियांचे मिळालेले प्रेम व काम करण्याची प्रेरणा कधीही विसरणार नसल्याचे मावळते उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी सांगितले. पक्षाच्या धोरणानुसार उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी त्यांनी सरपंच प्रियांका नाईक, सहकारी ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे सर्व स्थानिक व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केलेत. शहरातील अनेक विकासकामात आपल्याला उपसरपंच म्हणून हातभार लावता आला तसेच या कालावधीत संपन्न झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्य मिळवून दिले.
यावेळी सोबत राहिलेल्या भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा आपण शतशः आभारी आहे. आपले वडील हे स्वातंत्र्यसैनिक असून त्यांनी बांदा गावाचे सरपंचपद भूषविले आहे. त्यामुळे आमच्या घराण्याला समाजसेवेचा वारसा असून हाच वारसा पुढे घेऊन आपण बांदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कायमच कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात भाजप व महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे, प्रकल्प हे प्रस्तावित आहेत. त्यामुळे याचा फायदा शहरवासियांना होणार आहे.
खासदार नारायण राणे, तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हा व स्थानिक पातळीवरील पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने त्यांचे देखील आपण आभारी असल्याचे श्री सावंत यांनी सांगितले. पक्षाच्या आदेशानुसार उपसरपंचपदी विराजमान होणाऱ्या सदस्याला माझे सर्वातोपरी सहकार्य राहील.