अधिकाऱ्यांनी तडजोड न करता कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी – मत्स्य व विकास मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आपण नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे सांगतो पण जे कायदे केंद्र व राज्य सरकारने बनवले आहेत त्याची कठोर कारवाई प्रशासनाकडून होत नसल्यामुळे कायद्याची भीती नागरिकांमध्ये राहिलेली नाही असे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगून जेव्हा कारवाई सुरू असते तेव्हा अधिकाऱ्यांनी तडजोड न करता त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यावेळीच रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होईल असे त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात सांगून पुढच्या वर्षी अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी झालेली संख्या असावी निश्चित तुमच्या पाठीशी मी उभा राहीन आणि तुमचा नागरी सत्कार करेल असे त्यांनी सांगितले.
रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चे उद्घाटन मत्स व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ओरोस येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड उपस्थित होते. या उद्घाटनप्रसंगी विना अपघात एस टी बस चालक व रिक्षा व्यावसायिकांचे सत्कार करण्यात आले. तसेच वेगाची नशा हे पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. नेहमी अपेक्षा नागरिकांकडून करू नका तर आपण शासनातील आहोत आणि आपल्यावर जबाबदारी आहे. रस्ता सुरक्षा अभियानामध्ये जनजागृती करण्यापेक्षा कायद्याचे पालन कठोर करा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ देऊ नका. अनेक प्रकार तडजोडीने मिटवले जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या तडजोडी आहेत. जर रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण आणि त्या अपघातांमध्ये होणारे मृत्यू टाळण्यासाठी काम करायचे असेल तर प्रशासन म्हणून कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. सिंगापूर सारख्या देशांमध्ये चिंगम खाऊन थुंकणे सुद्धा जेलमध्ये जावे लागते. एवढे कडक कायदे राबवले जातात. मात्र आपल्याकडे अशा प्रकारे केले जात नाही. जर कठोर कायदे राबवले गेले तर निश्चित नागरिकांना सुद्धा शिस्त लागेल. ही शिस्त लावण्यासाठी आधी अधिकाऱ्यानी आपल्यामध्ये कायद्याची शिस्त आणणे गरजेचे आहे. या जिल्ह्यामध्ये दरवर्षी अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे जेव्हा कमी होईल त्यावेळी तुमचे निश्चितच आम्ही कौतुक करू. ही जबाबदारी आता परिवहन अधिकाऱ्यांची आहे. काही युवक रिल्स करण्याच्या नादात अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. अशा रिल्स करणा-या युवकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अपघातामध्ये एखाद्या व्यक्ती मयत झाला तर त्याच्या कुटुंबाची अवस्था बिकट होते. ते कुटुंब सावरत नाही असे सांगून पुढच्या वर्षी अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाली पाहिजे. असे सांगून या महामार्गावर एअर ॲम्बुलन्स असावी त्यासाठी आपल्याकडून प्रस्ताव यावा असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वालावलकर यांनी केले.