You are currently viewing पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची संपुर्ण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने

पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची संपुर्ण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने

पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची संपुर्ण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने

सिंधुदुर्गनगरी

नागरीकांना आवश्यक असलेले पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (Police Clearance Certificate) कमीत-कमी वेळेत प्राप्त व्हावे, तसेच कार्यालयात जाण्यासाठी लागणारा वेळ वाचावा याकरीता सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून ही प्रक्रिया माहे जानेवारी 2025 पासून पुर्णपणे ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.

नागरीकांना नोकरी, शिक्षण तसेच इतर कामकाजांसाठी पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (Police Clearance Certificate) ची नेहमी आवश्यकता भासत असते. यापूर्वी ही प्रक्रियेमध्ये अर्जदार ऑनलाईन पध्दतीने आपले अर्ज सादर करत होते.  अर्जदार यांना पोलीस ठाणे येथे पडताळणीकरीता व पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याकरीता प्रत्यक्ष यावे लागत होते. त्यामुळे अर्जदार यांना प्रवासाचा त्रास होत असे व अर्ज भरल्यापासून पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र प्राप्त होईपर्यंत वेळ लागत असे.

आता अर्जदारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केल्यानंतर त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे येण्याची आवश्यकता भासणार नाही. अर्ज सादर केल्यानंतर पोलीस ठाणे स्तरावर पडताळणी होवून, प्रकरण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात येईल. पोलीस अधिक्षक कार्यालय येथे पडताळणी झाल्यानंतर संबंधित अर्जदाराचे यूजर आयडी वर प्रमाणपत्र ऑनलाईन पाठविले जाईल. अर्जदार यांना ते स्वता ऑनलाईन पदधतीने डाऊनलोड करुन घेता येईल.

पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (Police Clearance Certificate) ची आवश्यकता असल्यास ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत. प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरीता अर्जदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष हजर राहण्याची, येण्याची तसेच कोणतेही अतिरीक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. प्रमाणपत्र हे डिजिटल स्वाक्षरी असलेला दस्तऐवज आहे व माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा, 2000 नुसार कायदेशीर रित्या वैध आहे.

पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (Police Clearance Certificate) करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन ते प्राप्त करुन घेण्यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे –

 सर्व प्रथम अर्जदारांनी https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx  या लिंकवर जावून तेथे दिलेला QR CODE स्कॅन करावा. नमूद फॉर्ममध्ये आपली सर्व माहिती भरावी. (उदा. नाव, पत्ता, शैक्षणिक माहिती), आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावी. (उदा. फोटो, ID / Address proof), आवश्यक शुल्क भरुन पोच पावती प्राप्त करावी. आपण निवडण्यात आलेल्या पोलीस ठाण्याच्या वतीने विहीत मुदतीत पडताळणी करुन पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविण्यात येईल. पोलीस अधीक्षक कार्यालयमार्फत पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (Police Clearance Certificate) विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन अपलोड करण्यात येईल. अर्जदारांनी https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx  या लिंकवर पुन्हा लॉग इन करुन आपले प्रमाणपत्र डाउनलोड करुन घ्यावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा