*कणकवलीत ९ ते १२ जानेवारी पर्यंत पर्यटन महोत्सवाचे आयोजन*
*दिग्गज गायकांचा रंगणार भव्य ऑकेस्ट्रा; समीर नलावडेंची माहिती…
कणकवली
शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात जिल्हा भाजपच्यावतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत ‘कणकवली पर्यटन महोत्सव’ होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेते सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, नितीन कुमार यांच्यासह पवनदीप आणि अरूणिता तसेच चेतना भारद्वाज याचा भव्य ऑर्केस्ट्रा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन तर माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे, सौ. निलम राणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे. जिल्हा भाजपच्यावतीने हा महोत्सव होत असल्याची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
येथील शहर भाजप कार्यालयात श्री.नलावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कणकवली पर्यटन महोत्सवाची माहिती दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, अण्णा कोदे, किशोर राणे आदी उपस्थित होते. पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ ९ जानेवारीला रात्री नऊ वाजता होणार आहे. तत्पूर्वी कणकवली शहरातील १७ प्रभाग आणि चार प्राथमिक शाळांचा सहभाग असलेले चित्ररथ निघणार आहेत. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, कुडाळचे आमदार निलेश राणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचा प्रारंभ होईल. त्यानंतर सलमान अली आणि वाद्यवृंद यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा होणार आहे.
१० जानेवारीला कणकवली शहर आणि परिसरातील तब्बल २५० कलावंतांचा सहभाग असलेला ‘कनकसंध्या’ हा कार्यक्रम रात्री आठ वाजता रंगणार आहे. ११ जानेवारीला इंडियन आयडॉल फेम रिशी सिंग, सायली कांबळे, नितीन कुमार आणि वाद्यवृंद यांचा ऑर्केस्ट्रा असणार आहे. रविववारी १२ जानेवारीला खासदार नारायण राणे, निलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन महोत्सवाचा समारोप होईल. त्यानंतर इंडियन आयडॉल फेम पवनदीप आणि अरूणिता तसेच चेतना भारद्वाज यांचा ऑकेस्ट्रा होणार आहे. याखेरीज पर्यटन महोत्सवाचे चारही दिवस फूड फेस्टिव्हल होणार आहे. महोत्सवात शहरातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील होणार आहे.