सावंतवाडीतील राजवाड्यात १२ जानेवारीला डॉ. शिवरत्न शेटे यांचे ‘रणझुंजार ताराराणी साहेब.!” विषयावर व्याख्यान.! ;
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आयोजन.
सावंतवाडी :
सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब.!” या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे लढवय्या ताराराणींच्या अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत.
आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वधर्म, स्वप्रजा यांच्या रक्षणार्थ पराक्रमाने ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. स्वराज्यासाठी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे व त्यांच्या तेजस्वी कामगिरीचे अनेक गड व किल्ले साक्षीदार आहेत. या प्रवासात महाराजांनी या गडांवर अनेक हल्ले, संकटांचा धैर्य, युक्ती व शक्तीच्या जोरावर निधड्या छातीने मुकाबला करत विजयी पताका फडकावली. त्याच्या साम्राज्य वेलीवर पुढे त्यांच्या पराक्रमाला साजेसे कार्य करणाऱ्यांमध्ये त्यांच्या स्नुषा महाराणी ताराबाई यांचे नाव आदराने घेतले जाते. मराठा साम्राज्याच्या इतिहासात पराक्रमी, कर्तबगार स्त्रियांचा वारसा महाराणी ताराबाई यांच्या केवळ उल्लेखाने आसमंत उजळून टाकतो.
ताराराणी या मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी विवाह होऊन त्या भोसले घराण्यात आल्या. त्यांनी मराठा साम्राज्यातील खूप मोठा संघर्षाचा काळ पाहिला आणि त्याचा एका सच्चा योध्याप्रमाणे मुकाबलाही केला. राजाराम महाराजांचे अकाली निधन झाल्यावर मराठा साम्राज्याची सूत्र महाराणीकडे आली. त्यांनी मुघलांशी निकराचा लढा देत मराठा सिंहासनाचे रक्षण केले. त्यांना खूप मोठ्या गृहयुध्दालाही सामोरे जावे लागले. मात्र त्या डगमगल्या नाहीत. करवीर संस्थान स्थापन करणाऱ्या या महापराक्रमी महाराणीनी इतिहास खऱ्या अर्थाने घडवला.
ताराराणींची ही संघर्ष गाथा इतिहासात फारशी सांगितली जात नाही. अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी ताराराणींची शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहीत असायलाच हवी. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे एका लढवय्या राणीचा, तिच्या शौर्याचा पराक्रमाचा इतिहास सखोल समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने डॉ प्रविणकुमार ठाकरे व सीए लक्ष्मण नाईक यांनी आवाहन केले आहे.
या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी शिवजागराचे… रयतेचे राजे शिवराय आमुचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, महाराजांची आग्र्याहून सुटका, नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे, प्रतापगडाचा रणसंग्राम, छत्रपतींचा दक्षिण दिग्विजय असे ७ पुष्प सादर करण्यात आले. याला आबाल वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे हे ८ वे पुष्पदेखील ऐतिहासिक राजवाड्याच्या
सिंधुदुर्गवासीयांच्या गर्दीने बहरणार आहे.
डॉ. शिवरत्न शेटे –

डॉ. शिवरत्न शेटे हिंदवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून महाविद्यालयीन जीवनापासून शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून व्याख्याने देत आहेत. आपल्या ओघवत्या वाणीच्या शिव व्याख्यानातून प्रत्यक्ष शिवसृष्टी उभारण्याचे कसब त्यांच्यात आहे. समकालीन बखरीसह इतिहासाचार्यांच्या भेटी व त्यांच्या लेखनाचा अभ्यासही त्यांनी केला आहे. तसेच राजे प्रत्यक्ष ज्या ज्या भागात व ज्या ज्या मार्गाने गेले त्याचाही त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी जुलै महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड तर हिवाळ्यात विविध गडकिल्ल्यांवर अशा दोन मोहिमा आयोजित केल्या जातात. यात हजारो शिवभक्त सहभागी होतात. तसेच शेतकरी आत्महत्या प्रबळ भागात शिवचरित्राच्या माध्यमातून संकटांचा सामना कसा करावा याबाबत व्याख्याने देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद जागवतात.