स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ माझे आंगण अभियान’
सिंधुदुर्गनगरी
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत ‘स्वच्छ माझे आंगण अभियान’ दिनांक १ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी केले आहे.
प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेचे उच्चतम मानक राखत ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनवणे, वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर आणि दैनंदिन स्वच्छतेचे पालन, घरगुती कचऱ्यांचे वर्गीकरण व पुनर्वापर, कंपोस्ट खत तयार करणे, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व पाझरखड्यांचा वापर करणे हे या अभियानाचे उद्दिष्टे आहेत.
या अभियानात स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या कुटुंबांचा २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत प्रशस्तीपत्र, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. ग्रामीण भागात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करून इतरांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभागी व्हावे. घरातील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व शौचालयांच्या स्वच्छतेबाबत नियमांचे पालन करावे. यासाठी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. महिला बचत गट व ग्रामस्थानी या अभियनात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन ही मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी केले आहे.
अभियानाचा कालावधी व टप्पे:
अभियान कालावधीः १ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५
पडताळणी कालावधीः २१ जानेवारी २०२५ ते २४ जानेवारी २०२५
पात्र कुटुंबांना निमंत्रणः २५ जानेवारी २०२५
प्रशस्तीपत्र व सन्मानः २६ जानेवारी २०२५