You are currently viewing मनाली वसुधा अनिल बोंडे : कलात्मक व्यक्तिमत्व 

मनाली वसुधा अनिल बोंडे : कलात्मक व्यक्तिमत्व 

 

काही वर्षापूर्वी डॉ. अनिल बोंडे त्यांच्या कन्येला मनालीला घेऊन माझ्या जिजाऊ नगरातील निवासस्थानी आले. मनालीने आयएएस करावे अशी डॉक्टरसाहेबांची इच्छा होती. तेव्हा ती नुकतीच दहावी झालेली होती. आम्ही तिघांनीही चर्चा केली. विचार विनिमय केला. मनालीचा पिंड माझ्या लक्षात आला. साधारणपणे आयएएस करणारी जी मुले आमच्याकडे येतात त्यांच्या आम्ही टेस्ट घेतो. आणि नंतरच निर्णय घेतो. पण मनालीच्या बाबतीत मला त्याची आवश्यकता वाटली नाही. तिच्या आवडीनिवडी आणि छंद मी जाणून घेतले. डॉक्टर साहेबांनी आणि मी एकमत केले. हिला ज्या क्षेत्रात जायचे आहे त्या क्षेत्रात हिला प्रोत्साहन द्यायचे. विशेष म्हणजे डॉक्टर साहेबांनीही त्याला अनुकूलता दर्शविली. अन्यथा पालक आपल्या भूमिकेवर ठाम असतात. पाल्याचा विचार करीत नाहीत. आपली महत्त्वाकांक्षा त्यांच्यावर लादतात. पण डॉ.अनिल बोंडे यांनी तसे केले नाही

आज आम्ही जेव्हा मनालीची कलेच्या क्षेत्रातील विकसनशील प्रगती पाहतो तेव्हा आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता असे आम्हाला जाणवते. मनाली आज जे काम करते आहे ते निश्चितच तिला समाधान देणारे तर आहेच. पण आगळेवेगळे पण आहे. आम्ही पालकांना सांगत असतो. पण सगळेच पालक एकतात असे नाही .मग पदरी निराशा पडते. पण डॉक्टर अनिल बोंडे हे एक सतर्क पालक आहेत. त्यांनी माझे म्हणणे ऐकले आणि मनालीला कलेची निसर्गाची कलात्मकतेची अन्य दालने उघडी करून दिलीत.

सध्या मनाली जर्मनीमध्ये आहे. वडील आमदार मंत्री आणि आता खासदार असले तरी मनाली ही सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे वागते हे तिचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तिने ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले अहंकाराला बाजूला बाजूला ठेवले नव्हे त्याचे उच्चाटनच केले त्यामुळे ती आपल्या ठिकाणी असलेल्या कलात्मकतेला उंचीवर नेऊ शकली. कुठल्यातरी मान्यवर व्यक्तीने म्हटले आहे की देश ओळखला जातो तो त्या त्या देशातील साहित्यिकांमुळे कलाकारांमुळे. राजकारणी येतात आणि जातात. कालांतराने लोकांना त्याचे विस्मरण होऊ शकते. पण साहित्यिकांच्या आणि कलावंतांचे तसे नाही. रशियाला आपण ओळखतो ते मॅक्झिम गॉर्कीमुळे अमेरिकेला ओळखतो ते शेक्सपियरमुळे आणि भारताची ओळख आहे ती रवींद्रनाथ टागोरांमुळे. कलेला निश्चितच अनन्य साधारण मूल्य आहे आणि म्हणूनच मोनालिसाचे चित्र आजही अजरामर आहे आणि ते अमूल्य आहे .पण हे ओळखायला खूप मोठी दूरदृष्टी लागते ती दूरदृष्टी डॉ.अनिल बोंडे व सौ वसुधा वहिनींनी ओळखली आणि आपल्या मुलीला तिला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यासाठी तिला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात आणि मोकळीक पण दिली.

मनालीने आपल्या छंदाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. त्यामुळे तिच्या ठिकाणी असलेल्या कलात्मकतेला लोकांसमोर मांडण्यासाठी तिला चांगला वाव मिळालेला आहे .अगदी कमी वयामध्ये तिचे दिल्लीला मुंबईला तिच्या कलात्मकतेचे प्रदर्शन तिला आयोजित करता आले . इतक्या कमी वयामध्ये दिल्ली आणि मुंबई सारख्या भव्य नागरी शहरात तिला तो सन्मान प्राप्त झाल्यामुळे तिच्या ठिकाणी कलागुणांना निश्चितच वाव तर मिळालाच पण चांगले प्रोत्साहनपण मिळाले. आपल्या कलेसाठी विषयवस्तू मिळण्यासाठी ती सर्वसामान्य माणसासारखी राहते. सामान्य माणसाप्रमाणे प्रवास करते. मग तो देशात असो की परदेशात .त्यामुळे अनुभव जास्त गाठीला बांधले जातात आणि ते कलात्मकतेतून व्यक्त करायला सहजता प्राप्त होते.

एकदा ती मला म्हणाली मला महानुभाव पंथाची हस्तलिखिते मोठ्या प्रमाणात पहावयाच्या आहेत. मी महानुभाव पंथाचे अभ्यासक श्री पुरुषोत्तम नागपुरे यांना फोन केला .त्यांचा प्रचंड व्यासंग महानुभाव पंथाला समर्पित आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही निघालो. सुरुवातीला पुजदा येथील महानुभाव आश्रमात गेलो. आश्रमात जाऊन नुसतं दर्शन घेणे हा उद्देश नव्हता. तर तिथले वेगळेपण टिपणे हे मनालीने ठरविले होते. रिद्धपूरला पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी लीळा चरित्र लिहिल्या गेले त्या स्थळाला आम्ही भेट दिली. आणि मग वेगवेगळ्या आश्रमांमध्ये जाऊन आम्ही तत्कालीन हस्तलिखिते पाहिले. इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेली हस्तलिखिते आजही जशीच्या तशीच आहेत. मनालीने कागदावर टिपण तर घेतलेच पण आपल्या मनावरही बिंबवले. तिथल्या मठाधिपतींना तिने प्रश्न विचारले व आपली पंथीय भूक समजावून घेतली. आम्ही एक दिवस रिद्धपूरात घालविला. रिद्धपूरचे माझे विद्यार्थी मित्र श्री शरद बिडकर व श्री रविंद्र बिडकर हे आमच्या सोबतीला होते. वेगवेगळ्या मठात घेऊन जाणे. तेथील प्रमुखांचा परिचय करून देणे व त्या ठिकाणी असलेल्या साधनसामग्रीची पाहणी करणे. तिथल्या आख्यायिका ऐकणे असा एकंदर अध्ययन प्रवास होता. राजमठात आम्ही आमचा बराच वेळ घालविला. तिथल्या लीळा समजावून घेतल्या. परतीच्या प्रवासामध्ये रवींद्र आणि शरद बिडकर यांच्या घरी आम्ही गेलो. मनाली त्या घरातही रमली. आज-काल नवीन पिढीची पावलं आपल्या ऐतिहासिक वांरस्याकडे आणि पुरातन व पुरोगामी ठेवीकडे वळत नाही. पण मनालीने मात्र महानुभाव पंथाच्या कार्याविषयी त्यादिवशी भरपूर माहिती घेतली. प्रत्येक गोष्ट ती वहीमध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये टिपत होती.

काही काळ डॉक्टर अनिल बोंडे यांनी आपल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे कामकाज मनालीकडे सोपवले. डॉक्टरसाहेब लोकप्रतिनिधी असल्यामुळे सतत व्यस्त. व्यस्त राहणे हा त्यांचा पिंड आहे. सौ. वसुधा वहिनीसाहेब खऱ्या अर्थाने त्यांच्या अर्धांगिनी आहेत. डॉक्टर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करतात. त्यामुळे हॉस्पिटल त्यांनी मनालीच्या हवाली केले. मनालीने आपल्या एमबीए पदवीचा व आपल्या ठिकाणी असलेल्या कौशल्याचा वापर करून तिथल्या डॉक्टरांना कर्मचाऱ्यांना व रुग्णांना आपलेसे करून घेतले.

आपल्या आजोबांच्या वाढदिवसाला आपल्या दवाखान्यातील सर्व सहकाऱ्यांना बोलावून तिने तुम्ही आमच्या परिवारातील घटक आहात ही आत्मियता तयार करून दिली.

तिच्या कलात्मकतेला जोड आहे ती कवितेची. आपल्या मनात आलेल्या भावनांना कवितेद्वारे तिने वाट करून दिली आहे. त्या कवितांचे संकलन आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पेंग्विन प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. इतक्या कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या प्रकाशनाने तिचा काव्यसंग्रह प्रकाशित करणे ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे.

सामान्यपणे डॉक्टरांची मुले डॉक्टरच होतात .डॉक्टर बनून अनिल बोंडे आपल्या मुलीला अगदी सहज डॉक्टर करू शकले असते .पण त्यांच्या संवेदनशील मनाने मनालीमधील कलात्मकतेचा तिच्या छंदाचा कल ओळखला आणि तिला तिच्या क्षेत्रात करिअर करण्याची मोकळीक दिली .त्यामुळे ती एवढी भरारी घेऊ शकली.ही तर सुरुवात आहे. आज मनालीचा वाढदिवस. आज एक जानेवारी संपूर्ण जगात धुमधडाक्यात साजरा होणार आहे. पण मनालीच्या वाढदिवसानिमित्त डॉ अनिल बोंडे व डॉ वसुधा बोंडे यांनी एक चांगला संकल्प जाहीर केलेला आहे आणि तो अमलात आणण्यासाठी तसे नियोजन केले आहे. तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधून अतिशय आवश्यक बाब असलेल्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतः डॉक्टर अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतला आहे .असे चांगले पालक मिळाले तर आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहत नाही. आपण मुलांच्या इच्छा दाबून त्यांना आपल्याला जे पाहिजे ते करायला लावतो त्यांना डॉक्टर करतो. इंजिनियर करतो आणि त्यांच्यातला कलाकार मग मरून जातो. जे जीवन ते जगतात. त्यात ते समाधानी नसतात .खरे समाधान असते ते आपल्याला मनासारख्या भावलेल्या विश्वात काम करणे. योगायोगाने मनालीला सुज्ञ पालक लाभल्यामुळे मनाली आज देशात नव्हे देखील परदेशात देखील आपल्या कार्यकर्तृत्वाच्या कक्षा रुंदावत पुढे चालली आहे. यात डॉक्टर साहेब व वहिनी साहेब तिला भरपूर वेळ व सहकार्य करू शकत नाहीत. पण ते दोघेही खंबीरपणे तिच्या कलात्मक पाठीशी उभे असल्यामुळे मनालीची ही कलात्मक वाटचाल अशीच प्रगतीपथावर राहणार आहे.

 

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आय ए एस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा