You are currently viewing कोणाचे काय जाते…?

कोणाचे काय जाते…?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कोणाचे काय जाते…?*

 

पिझ्झा बर्गर आले आले ज्वारी बाजरी गेली

बघता बघता किती वाढली पोटावरती थैली

सडासारवण दळणकांडन पोतेरेही गेले

कमरेवरती डुलूडुलू मग छान टेकडी हाले…

 

बाईक आल्या कार आल्या बंदच पायी फिरणे

जिम मध्ये वॅाकरवरती नावाला हुंदडणे

गल्लोगल्ली खाऊघरे ती येताजाता चरणे

ढोल ताशे जणू वाजती रात्रीस पहा घोरणे…

 

धुडूमधाड फासफूस करत कुशीवर विव्हळणे

पोटाचा डोंगर खालीवरती आटोक्यात न येणे

शेजारचा ना झोपू शकतो गजर रात्री चाले

मी रात्रभर जागा हो, वरून ऐकून घेणे….

 

कसरत सारी गेली लयाला तोंड सारखे चालू

गिरणीतून हो जात असती वडे पाव आलू

थप्पीवर लागताच थप्पी दिक्षित दिवेकर येती

उलटे सुलटे देऊन सल्ले चांगलेच नागवती…

 

करून एवढे जैसे थे हो जरा न काटा हलतो

हॅार्ट ॲटॅक बी पी डायबिटीस घर पोखरत येतो

मुळी न लागे चाहूल त्यांची शेवटास ते नेती

तरीही वाटत नाही जराही आम्हाला हो भीती…

 

हा गेला हो तो गेला हो रोज बातम्या येती

मी नाही हो मी नाही हो, म्हणती नेती नेती

तिकिट फाटते एक दिवस मग घर पोरके होते

अडत नाही कोणाचे हो, कोणाचे काय जाते?

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा