You are currently viewing व्यथा नंदिची

व्यथा नंदिची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम बाराक्षरी रचना*

 

*व्यथा नंदिची*

**********

 

माझ्या प्रिय धन्या जगाच्या पोशिंद्या

तुझा मी नंदी आज पोरका झालो

काय माझे चुकले मला कळेना

तुझ्या वियोगे काकुळतीला आलो।।१।।

 

आज येता यंत्र तुझ्या सोबतीला

केली गोठ्यातून उचलबांगडी

पिढ्यानपिढ्यांचे विसरून नाते

कत्तलखान्यात घोटली नरडी।।२।।

 

शेत अपुले आम्ही नांगरताना

चिखलात पाय तुडवीत होतो

सोन्या-राजा अशी तू हाक मारता

आम्ही डौलाने औत ओढत होतो।।३।।

 

कोसळल्या कितीही पाऊस धारा

झटकून अंग घेतला उबारा

कधी दिवसा रितेपोटी राहून

तुझ्या सोबतच घेतला निवारा।।४।।

 

येता धान्य घरी सुगीच्या दिवशी

दिली नवीन भाकरी माझे मुखी

माझ्या पाठीवर हात फिरताना

वाटे माझ्याहून कोण बरे सुखी?।।५।।

 

चिमुकली बाळे कधिही रडता

माता दाखवी ती हम्मा ममतेने

आज गोठा ओशाळला माझ्याविना

कोण थांबवील चिमण्या त्वरेने?।।६।।

 

पोळा, दिवाळी सण मज भाग्याचे

सजवून मला पुजीले थाटाने

पण सख्या तुझ्या दारी जन्म घेणे

शाप वाटे आज खाटीक भयाने।।७।।

 

माझ्या प्रिय स्वामी शेतकरी राजा

जोड नाते अपुले पुन्हा एकदा

नाहीतरी गमावून बसशील

तुझे ते नि:स्वार्थ आनंद कैकदा।।८।।

 

*********************************

*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा

*मो.नं.:-* ८९२८२९२२५४

 

 

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

प्रतिक्रिया व्यक्त करा