मूर्तीशास्त्र, स्थापत्य संशोधन परिषदेच्या निमंत्रित सदस्यपदी सतीश लळीत
सावंतवाडी
सिंधुदुर्ग भारतीय मूर्ती आणि स्थापत्य संशोधन परिषदेवर ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’चे अध्यक्ष व कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांची निवड निमंत्रित सदस्य म्हणून झाली आहे. परिषदेचे पाचवे राष्ट्रीय अधिवेशन पुणे येथे १० व ११ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष व पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत गणवीर यांनी दिली आहे.
भारतीय मूर्ती आणि स्थापत्य संशोधन संस्था (इंडियन स्क्लप्चर अँड आर्किटेक्चर रिसर्च कौन्सिल – आयएसएआरसी)ही संस्था भारतीय मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र, पुरातत्व, प्रागैतिहासिक कला, पाषाणकला या क्षेत्रात संशोधन कार्य करते. तसेच या विषयात काम करणाऱ्या देशभरातील संशोधकांना व्यासपीठ मिळण्यासाठी गेली चार वर्षे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करते. संस्थेच्या सचिव म्हणून डॉ. शांता गीते, कोषाध्यक्ष म्हणून डॉ. दत्ता हिंगमिरे, उपाध्यक्ष डॉ. नीतिन बावले, माजी अध्यक्ष डॉ. अरविंद सोनटक्के कार्यरत आहेत. डॉ. सोमनाथ रोडे आणि भुजंग बोबडे यांचीही निवड निमंत्रित सदस्य म्हणून झाली आहे.
श्री. लळीत यांनी कातळशिल्प संशोधनात गेली २४ वर्षे केलेले काम लक्षात घेऊन त्यांची निवड संस्थेच्या कार्यकारिणीवर एकमताने करण्यात आली आहे. गेल्या वर्षी संस्थेचे चवथे राष्ट्रीय अधिवेशन निलंगा येथे झाले होते. या अधिवेशनात श्री. लळीत यांनी’कातळशिल्पांमध्ये आढळलेला मातृदेवता संकल्पनेचा उगम’ या विषयावर शोधनिबंध सादर केला होता.परिषदेचे पाचवे अधिवेशन १० व ११ जानेवारी २०२५ला पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे होणार आहे. या अधिवेशनाची मुख्य विषयसंकल्पना (थिम) ‘चिरंतन दख्खन: लेणी, मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्राचा शोध’ ही आहे.
या राष्ट्रीय परिषदेत श्री. लळीत कोकणातील एका नव्या पुरातत्वीय संशोधनावर शोधनिबंध सादर करणार आहेत.या परिषदेत मंदिर स्थापत्य या विषयावर वास्तुरचनाकार अँडम हार्डी (ब्रिटन), डॉ. शिखा जैन, डॉ. उज्वला पळसुले यांची तर मूर्तीशास्त्र, गुहाचित्रे व लेणी या विषयावर प्रो. दीपक कन्नाल, डॉ. शांतीस्वरुप सिन्हा, प्रा. आर.एच. कुलकर्णी, प्रा. उषाराणी तिवारी यांची व्याख्याने होणार आहेत.