*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*द शो मस्ट गो ऑन*
*संस्कार*
बाजारात गेल्यावर विविध आकाराचे, रंगांचे छोटे, काही अत्यंत सुबक तर काही अगदी साधेसुधे असे मातीचे घडे पाहिले की मनात येते, समाजात वावरणारी ही माणसे सुद्धा अशीच या घड्यांसारखीच आहेत नाही का?
आयुष्याच्या या सतत चालणाऱ्या खेळात जन्माला आलेला प्रत्येक जीव म्हणजे ओल्या मातीचा गोळाच! त्याला घडविणारे त्याचे आई-वडील, कुटुंबातील इतर प्रमुख मंडळी, आणि त्याचे गुरुजन जसा आकार देतील त्याप्रमाणेच तो दिसणार, बोलणार, वागणार, हे नक्की! म्हणजेच हा खेळ जर यशस्वीरित्या खेळायचा असेल तर लहानपणापासून बाळावर घडणाऱ्या संस्कारांचे फार महत्त्व आहे.
मुलाला बोलायला कोण शिकवते? तसे पाहिले तर कुणीच नाही. घरातील माणसांचे बोलणे ऐकूनच त्याच्या मुखावाटे एक एक शब्द बाहेर पडतात आणि आईला त्याचे फार अप्रूप वाटते. याचाच अर्थ असा की, त्याच्या कानावर सतत चांगलेच शब्द पडले पाहिजेत. काही लोकांना अगदी साध्या साध्या बोलण्यात सुद्धा अपशब्द वापरायची सवय असते. त्यांना कदाचित आपण अपशब्द वापरत आहोत हे समजतही नसेल, परंतु ते लहानगे मात्र नेमका तोच शब्द ध्यानात ठेवून त्याचा अर्थही न समजता बोलू लागतो, आणि पुढे मोठेपणी तो कायम तसाच बोलतो.
मुलेच ती! मस्ती तर करणारच. परंतु मस्तीलाही काही प्रमाण असते. अशी कितीतरी उदाहरणे आपण बघितली असतील की, एकाद्वाड मुलाने मस्ती मस्तीत बिचाऱ्या शांत मुलाचा हात खेचला आणि तो खांद्यातून निखळून बाहेर आला, कोण्या मुलाने एका मुलाच्या डोळ्यात रागाने धूळ उडवली आणि त्या मुलाच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यापर्यंत पाळी आली. थोडक्यात डोळा जाता जाता वाचला. हे असे प्रकार त्या त्या मुलावर झालेल्या संस्कारांवरच अवलंबून असतात. थोडक्यात माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची घडण पूर्णपणे तो ज्या वातावरणात लहानाचा मोठा होतो आणि ज्या संगतीत तो राहतो त्यावरच अवलंबून असते.
*खाण तशी माती* असे आपण म्हणतो. आई-वडिलांचे जीन्स मुलांच्यात येतात. गवयाचे मूल सुरातच रडणार. कालच मी माझ्या बहिणीच्या नातीने, आजीचा वाढदिवस म्हणून तिच्यासाठी बनविलेले ग्रीटिंग कार्ड पाहिले. आठ वर्षाचीच मुलगी ती, परंतु स्वतःच्या कल्पनेने तिने आजीचे चित्र काढले होते. माझी बहीणही उत्तम चित्रकार होती. आजीचा हा गुण नातीत उतरला. डॉक्टरांची मुले बहुदा डॉक्टरच होतात, आणि वकिलांची वकील. वडिलांचा व्यवसाय वारशाने मुलाकडे येतो आणि मुलगा तो पुढे नेतो, ही जगराहाटीच आहे.
भारतीय सेनेचा विचार केला, तर दिसून येते की सेनेतील ८० ते ९० टक्के जवान, सेनाधिकारी हे पंजाबी, शीख, जाटच असतात. मला वाटते, त्यांच्या पेशीतच कणखरपणा, धारिष्ट्य, लढण्याची अधिक क्षमता असावी. त्यांची देहयष्टी बघता महाराष्ट्रातील किंवा दाक्षिणात्य लोकांच्या तुलनेत चांगलीच बलदंड असते.
अरे ला का रे करणारे जसे असतात, तसेच शांत प्रवृत्तीचे, कोणासही कधीही विरोध न करणारे, कोणाची मने न दुखवणारे असेही असतात. काही अत्यंत स्वार्थी तर या उलट निस्वार्थी वृत्तीने सतत गरजवंतांना मदतीचा हात देण्यासाठी धावणारी असतात. कामचोर लोकांसोबतच कर्तव्याला जीवनात महत्त्व देणारे साधू पुरुष आहेतच की!
निवडुंगाच्या काटेरी कुंपणासोबत अंगणात पारिजातकाचाही सडा पडतो नाही का? तसेच आहे. अमानुषता पसरलेली दिसली तरी माणुसकी संपलेली नाही.
पटावरच्या या सोंगट्यांसोबत जन्ममृत्यूचा हा खेळ अविरत चालू आहे, आणि चालूच राहणार आहे.
*द शो मस्ट गो ऑन.*
अरुणा मुल्हेरकर
मिशिगन.