*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*गंध सोनचाफ्याचा*
सोनचाफ्याचा पिवळ्या फुलांचा सडा पाहिला की येणाऱ्या नव्या किरणांसोबत प्रसन्न होऊन जायचं मन.. मनातले कितीतरी प्रश्न, कितीतरी विचार त्याला सांगायचे नकळत आणि तोही जणू सगळे समजल्याचा आव आणून आणखी डोलायचा.. माझा सोबती सोनचाफा माझ्या मनाच्या प्रत्येक भावनेला प्रतिसाद देणारा..
गंध चाफ्याचा.. !! काही माणसांच्या
सहवासात आठवणीचा चाफा हळूच दरवळतो. अळवाच्या पानावर पाण्याचा थेंब साचून क्षणभर त्याचा मोती व्हावा ना तसा.. अशा माणसाच्या सहवासात क्षणाचे शिंपले मोती बनतात अन् जर अशी माणसे बुजर्ग असतील तर त्यांच्या सुरकुती पडलेल्या हाताच्या हळूच स्पर्शाने प्रेमाचा आनंद मिळतो…
आठवणीतल्या वहीत कोणत्या तरी पानात गुडूप झालेली.. आजच्या सोशल दुनियेच्या युगात आभासी लोकांना जवळ करणारी आमची पिढी अशा सुगंध देणाऱ्या आठवणींपासून अलिप्त झाली आहेत ह्याचे क्षणभर शल्य वाटते..
निरोपाच्या त्या क्षणी माझी मैत्रीण पटकन् वळली आणि सोनचाफ्याची फुलं घेऊन आली… ती ताजीतवानी, घमघमती फुलं तिनं माझ्या ओंजळीत ठेवली आणि माझ्या ओंजळीला तो उबदार स्पर्श जाणवला.
बाहेर तुफान गर्दी होती. माणसांचे लोंढेच्या लोंढे दोन्ही बाजूंनी फेकले जात होते.. माणसांची एकच एक प्रवाही लाट होऊन बाहेरच्या दिशेने वाहात होती. मीही त्या लाटेतली एक थेंब होती.. वाहात होती… एका ठिकाणी मात्र ही लाट किंचितशी दुमडून पुढे जात होती. कुठल्यातरी अडथळ्याला वळून ओलांडत होती. क्षणभरात मी ही तिथवर पोहोचली. बाजूला पाहिले तर एक लहानखुरी बाई छोट्याशा परडीत चाफ्याची फुलं विकत बसली होती. त्या अजस्र प्रवाहातही सोनचाफ्याची घमघम परडीतून माझ्यापर्यंत पोचत होती. तो सुवासिक सुगंध ओलांडून मला तसंच पुढे जाववेना.. मी त्या प्रवाहातून अलग होत तिच्या परडीसमोर येऊन उभी राहिली.. हिरवे देठ दोऱ्याने बांधून त्या बाईंने तीनचार सोनरंगी फुलांचा एक असे गुच्छ तयार केले होते. त्यातला एक मी विकत घेतला आणि . .आहाहा….! तोच वर्षांनुवर्षे वेड लावणारा, मन धुंद करून टाकणारा आदिम गंध… भोवतालचे जग विसारायला लावणारा…अनेक वर्षानंतरही दोस्तीशी इमान राखणारा.. आजवर कधीही न बदललेला. . सुखाच्या क्षणी आनंद वाढवणारा, कुंद क्षणी मनाची उमेद वाढवणारा, निरभ्र निखळ लहानपण परत आणून देणारा असा हा चाफ्याचा गंध… मी त्यात हरवून गेली..
चाफ्याची आणि माझी दोस्ती किती जुनी..! तस्साच वेड लावणारा.. लहानपणी मनात गोफ विणलेला हा चाफा नंतरही सतत भेटतोच आहे.
चाफ्याची ती पिवळीधमक श्रीमंती पाहात. मनात आलं कवी बी यांनी चाफ्याचंच रूपक आपल्या कवितेत का घेतलं असेल ? त्यांच्याही मनात एक चाफा घर करून राहिला असेल का ? सोनचाफ्याचं फूल कसं पानाच्या सोबतीनं एकटंच येतं.. समूहानं नाही फुलत… प्रत्येक फुलाचं निराळं व्यक्तिमत्त्व… तसंच सोनचाफ्याच्या झाडाचंही… चाफा एकटा उभा असण्यात त्याची खरी मौज… मनोमन वाटत राहिलं, बी म्हणजे भ्रमर असं टोपण नाव घेणाऱ्या नारायण मुरलीधर गुप्ते यांच्याही मनात चाफ्याचं हे एकटेपण रुजलं असणार असं मला वाटतं..
एकदा चाफा यावर मी आणि माझी जीवलग मैत्रीण गप्पा मारत होतो चाफा यावरून सुरू झालेल्या आमच्या दोघींच्या गप्पा फुलपाखरासारख्या उडत उडत अनेक विषयांचा मध चाखत होत्या..बराच वेळ झाला होता आता गप्पा संपवून घरी जायलाच हवं होतं. आम्हाला दोघींनाही… दिवसभर त्या गप्पांचा आणि चाफ्याचा दरवळ मी श्वासात भरून घेत राहिली… आजही त्या गप्पा आणि तो चाफा आठवला की मी हळवी होते…
आजही चाफ्याची फुलं माझ्या मनात ताजीच असतात… मी नव्यानं सोनचाफा ओंजळीत घेते तेव्हा ते सारे स्मरणगंध या ताज्या वासात मिसळून येतात आणि माझं सोनचाफ्यावरचं प्रेम मग आणखीनच वाढतं… वाढतं जातं…
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे@
9870451020