आजगाव :
साहित्य समाजमनाला उन्नत करते.जगणं संयत करते आणि निराशलेल्या मनात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करते. अनुभवातून आलेली अस्वस्थता घेऊन साहित्यिक लिहीत असतो. त्यामुळे साहित्य वाचकाच्या जीवनाला अनुभवसंपन्न बनवते, असे प्रतिपादन गोव्यातील लोककलेच्या व लोकसाहित्याच्या अभ्यासक तथा नामवंत साहित्यिक प्रा.पौर्णिमा केरकर यानी नुकतेच शिरोडा (सिंधुदुर्ग) येथे रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात आयोजित प्रेरणा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.
आजगांव (सिंधुदुर्ग) येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग पन्नासाव्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून शिरोडा येथील एकशे अठरा वर्षे जुन्या खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
साहित्य तथा संस्कृतीचे अभिजात संचित लाभलेल्या शिरोड्याच्या भूमीशी माझ्या माहेरचा दुवा जुळलेला आहे. धालो, फुगडी यासारखी लोकनृत्ये, दशावतार, रणमालेसारखी लोकनाट्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंचित आहे. गोवा आणि सिंधुदुर्ग ही भूमी भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या जरी वेगळी असली, तरी सांस्कृतिकदृष्ट्या या दोन्ही प्रदेशांचे अनुबंध जुळलेले आहेत, असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, कार्याध्यक्ष रघुवीर तथा भाई मंत्री, कार्यवाह सचिन गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश म्हस्के, साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत कवी विनय सौदागर, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालयाचे मुख्याधिकारी सचिन हजारे व मांद्रे (गोवा) येथील ‘साहित्य संगम’ चे कार्यवाह प्रा.गजानन मांद्रेकर यांच्या उपस्थितीत संमेलनाध्यक्ष पौर्णिमा केरकर यांच्या हस्ते सरस्वती, वि.स.खांडेकर व जयवंत दळवी यांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात वाचनवृद्धीसाठी ‘मी केलेले प्रयोग’ या विषयावर कोंकणातील दशावतार कलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा.विजय फातर्पेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात कोकण मराठी साहित्य परिषदेचे मालवण शाखाध्यक्ष सुरेश ठाकूर व म्हापसा, गोवा येथील श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनी शिक्षक तथा विद्यार्थ्यांमध्ये वाचनवृद्धी व्हावी यासाठी केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली.
विनय सौदागर यांच्या ‘मुबाई’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन शिरोड्याच्या सरपंच लतिका रेडकर यांच्या उपस्थितीत निवृत्त शासकीय अधिकारी सतीश लळीत यांच्या हस्ते, तर कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने काढलेल्या ‘कनक रंगवाचा’ विशेषांकाचे प्रकाशनही संमेलनाध्यक्ष पौर्णिमा केरकर यांच्या हस्ते आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सुप्रसिद्ध कवी डॉ.सुधाकर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात स्नेहा नारिंगणेकर, सोमा गावडे, मिहीर नाईक, भालचंद्र दीक्षित, नीलम कांबळे, संकेत येरागी, सदानंद बांदेकर, आसावरी भिडे, सुभाष शेटगावकर, पुरुषोत्तम कदम, विठ्ठल कदम व विनय सौदागर यांनी कविता सादर केल्या.
शिरोड्यापासून जवळच असलेल्या आरवली येथे जन्मलेले सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ठेवलेल्या ‘‘स्मरण जयवंत दळवींचे’ या विशेष कार्यक्रमात जयवंत दळवी यांची पुतणी शुभा दळवी कुलकर्णी यानी ‘आमचे जयाकाका’ या विषयावर बोलताना दळवी यांचे कौटुंबिक रूप चित्रित केले. गोव्यातील नामवंत लेखिका सोनाली परब सावळ देसाई यानी दळवी यांची ‘वाट ही सरे ना’ या कथेचे भावपूर्ण वाचन केले. साहित्य प्रेरणा कट्टा व खटखटे ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दर आठवड्याला जयवंत दळवींच्या पुस्तकांवर होणाऱ्या चर्चेसंदर्भात ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यानी माहिती दिली. वामन पंडित यानीही दळवी यांच्या काही हृद्य आठवणी सांगितल्या.
जयवंत दळवी आरवली येथील ज्या शाळेत शिकले त्या जीवनशिक्षण शाळेच्या व आजगांव येथील गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या लेखनस्पर्धेतील विजेत्यांना संमेलनाध्यक्षांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
गोव्यातील नाट्यलेखक पांडुरंग गावडे यांच्या ‘सखी जन्मांतरीची’ या नाटकाचे पुस्तक भेट देऊन संमेलनास उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
समारोपाच्या सत्रात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व संबंधितांचे व महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करणारा व कै.जयवंत दळवी यांचे आरवली-शिरोडा परिसरात कायम स्वरूपी स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाकडे मागणी करणारा ठराव अनुक्रमे सोमा गावडे व शेखर पणशीकर यानी मांडला, तर वाचनवृद्धीसाठी प्रयत्नशील रहाण्याचा संकल्प करण्याचा ठराव संध्या आरोलकर यानी मांडला. तिन्ही ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले.
मोकळ्या वेळेत आत्माराम बागलकर यानी ‘रायगडाला जाग येते’ या नाटकातील प्रवेश सादर केला. तेजल गावडे या विद्यार्थिनीने जुन्या मराठी कविता सादर केल्या तर, नामवंत गायक युसूफ आवटी यानी जुनी मराठी गाणी सादर केली.
ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, सरोज रेडकर, स्नेहा नारिंगणेकर, सुभाष शेटगावकर, अर्चना लोखंडे यांनी विविध सत्रांत ऋणनिर्देश केला.
खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष अनुक्रमे राजन शिरोडकर व भाई मंत्री यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन व अनिता सौदागर यांच्या हस्ते ओटी भरून संमेलनाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.
संमेलन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी यानी केले. विनय सौदागर यानी शेवटी सर्वांचे आभार मानले.