सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहिर…
अनंत वैद्य, आत्माराम राऊळ, किशोर सावंत, श्रीमती सुनिता भिसे यांना पुरस्कार जाहीर…
सावंतवाडी :-
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श ग्रंथालय, आदर्श ग्रंथालय कर्मचारी व आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता २०२४-२०२५ पुरस्कार आज घोषित करण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोली व ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथ संग्रहालय, गोवेरी, कुडाळ यांना आदर्श ग्रंथालय पुरस्कार जाहीर झाला आहे, तर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनंत आप्पाजी वैद्य, कुडाळ व नेमळे ग्रंथालयचे अध्यक्ष आत्माराम भिकाजी राऊळ यांना घोषित करण्यात आला आहे. ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार नगर वाचनालय वेंगुर्ल्याचे कर्मचारी किशोर भगवान सावंत व मुक्तद्वार वाचनालय कळणेची कर्मचारी श्रीमती सुनिता भिसे यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक आज २५ डिसेंबरला जिल्हा ग्रंथालय संघ कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, सचिव राजन पांचाळ, सहसचिव महेश बोवलेकर, संचालक ॲड. संतोष सावंत उपस्थित होते. या पुरस्काराचे वितरण २९ डिसेंबर रोजी माणगाव येथे होणाऱ्या जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनामध्ये सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे.