You are currently viewing यंदाचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार संदीप परब आणि सत्यजित चव्हाण यांना जाहीर

यंदाचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार संदीप परब आणि सत्यजित चव्हाण यांना जाहीर

मालवण येथे परिवर्तन मुंबईतर्फे आयोजन

मालवण :

परळ येथील परिवर्तन मुंबई या संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा झाली असून, यावर्षी कोकणातील प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या सत्यजित चव्हाण तसेच निराधार वृद्ध, मानसिक विकलांग यांना मायेचा आधार देणारे संदीप परब अशा दोघांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

परिवर्तन मुंबई या संस्थेतर्फे गेले १९ वर्षे दिवंगत स्वातंत्र्यसैनिक तसेच ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते लक्ष्मण जाधव यांच्या स्मृत्यर्थ सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. १० हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी पुरस्कार सोहळा मालवण येथील नाथ पै सेवांगण संस्थेत सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य तसेच जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर हे उपस्थित राहणार आहेत. परिवर्तन मुंबईचे जगदीश नलावडे, विद्यमान अध्यक्ष सारिका साळुंखे, तसेच सचिव पांडुरंग तथा राज तोरसकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे.

पुरस्काराचे मानकरी ठरलेले सत्यजित चव्हाण हे पर्यावरणवादी कार्यकर्ते असून कोकणातील खाण प्रकल्प, नाणार व बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी, जैतापूर येथील नियोजित अणुऊर्जा प्रकल्प याच्या विरोधातील लढ्यात ते सक्रिय राहिले आहेत. त्यामुळे राजापूर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्याबरोबरच त्यांना सहा दिवस तुरुंगातही राहावे लागले होते. पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना दहशतवादी ठरविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. पण, केवळ संघर्षाची भूमिका न घेता, कोकणचा पर्यावरणपूरक विकास कसा करता येईल, यासाठीही ते सक्रिय आहेत.

कुडाळ येथील संदीप परब रस्त्यावर राहणाऱ्या निराधार वृद्ध तसेच मानसिक विकलांगांना आधार देण्याचे काम कित्येक वर्ष करीत आहेत. त्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील पणदूर गावात जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून संविता आश्रमाची स्थापना केली आहे. सध्या मुंबईत चार, गोव्यात दोन ठिकाणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन ठिकाणी त्यांच्या पुढाकाराने आश्रम सुरू आहेत. आतापर्यंत ५१० निराधारांना उपचार करून, घरी पोहोचविले आहे. तर ३०० हून अधिक निराधार त्यांच्या आश्रमात आश्रयाला आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा